देशात हिंदूंना बदनाम करण्याचं मोठं षडयंत्र; सरसंघचालक मोहन भागवत यांनी केला दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2019 10:43 AM2019-07-28T10:43:03+5:302019-07-28T10:44:47+5:30
काही राज्यात तर एक योजनेद्वारे धर्म परिवर्तन केलं जात आहे. देशात आज जी परिस्थिती आहे ती पाहता संघाच्या सर्व प्रचारकांनी सतर्क राहणं गरजेचे आहे.
नवी दिल्ली - गोरक्षेच्या नावावर देशात ठिकठिकाणी होणाऱ्या मॉब लिंचिंगच्या घटना या हिंदू धर्म आणि संस्कृतीला बदनाम करण्याचं षडयंत्र आहे असा आरोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केला आहे. अखिल भारतीय सामाजिक सद्भाव समितीकडून आयोजिक केलेल्या दोन दिवसीय बैठकीत ते बोलत होते.
यावेळी बोलताना मोहन भागवत म्हणाले की, देशभरात हिंदू धर्माला आणि संस्कृतीला बदनाम करण्याचं मोठं षडयंत्र रचलं जात आहे. मॉब लिंचिंगच्या नावाखाली समाजामध्ये दुही निर्माण करण्याचं काम सुरु आहे. गोरक्षेच्या नावाखाली अनेक ठिकाणी मारहाणीच्या घटना होत आहेत. काही राज्यात तर एक योजनेद्वारे धर्म परिवर्तन केलं जात आहे. देशात आज जी परिस्थिती आहे ती पाहता संघाच्या सर्व प्रचारकांनी सतर्क राहणं गरजेचे आहे.
तसेच हिंदू धर्म रक्षणासाठी विविध जातीपंतातील लोकांना एकत्र आणत समाजात निर्माण होणारं भेदभाव दूर करण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे निश्चितच सामाजिक स्तरावर समस्या सोडविण्यासाठी मदत होईल असा विश्वास मोहन भागवत यांनी व्यक्त केला.
या बैठकीला भारतीय सामाजिक सद्भाव समितीचे उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार, राजस्थान, हरियाणा, पंजाब, मध्यप्रदेश, गुजरात, जम्मू काश्मीर, कर्नाटक, केरळ, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, दिल्ली, त्रिपुरा आणि मेघालयसह अन्य राज्यातील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
काही दिवसांपूर्वी देशभरात वाढत असलेल्या मॉब लिंचिंगच्या घटनांमुळे व्यथित झालेल्या विविध क्षेत्रातील 49 मान्यवरांनी एकत्र येत पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले असून, या पत्रांमध्ये मॉब लिंचिंगच्या वाढत्या घटनांबाबत चिंता व्यक्त करण्यात आली होती. तसेच देशात असंतोषाचे दमन होणार नाही असे वातावरण निर्माण करण्याची विनंती या मान्यवरांनी नरेंद्र मोदींना केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिणाऱ्या मान्यवरांमध्ये मणिरत्नम, अडूर गोपालकृष्णन, रामचंद्र गुहा, अनुराग कश्यप यांच्यासह कला, साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातील 49 जणांचा समावेश आहे. देशामध्ये निर्माण होणाऱ्या असंतोषाचे दमन न होता त्याला मोकळी वाट मिळेल, असे वातावरण निर्माण करावे, तसेच हा देश एक प्रबळ राष्ट्र बनावे, अशी विनंती या पत्राच्या माध्यमातून पंतप्रधानांना करण्यात आली आहे.