'राम मंदिर प्रकरणाचा निकाल विरोधात गेल्यास गेल्यास हिंदू आंदोलनं करतील'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2018 10:27 AM2018-05-13T10:27:35+5:302018-05-13T10:27:35+5:30
विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष विष्णू कोकजे यांचं विधान
नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिर प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल विरोधात गेल्यास देशभरात आंदोलनं होतील, असं विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष विष्णू कोकजे यांनी म्हटलं आहे. न्यायालयानं भावना दुखावणारा निकाल दिल्यास, अयोध्येत राम मंदिराची उभारणी करण्याचा कायदा संमत करण्यासाठी देशभरातील हिंदू आंदोलनं करुन त्यांच्या खासदारांवर दबाव आणतील, असंही त्यांनी म्हटलंय. विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर प्रथमच कोकजे यांनी हरिद्वारला भेट दिली. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
सर्वोच्च न्यायालयात असलेला राम जन्मभूमी प्रकरणाचा खटला लवकरच निकाली निघेल, अशी अपेक्षा कोकजे यांनी व्यक्त केली. 'सर्वोच्च न्यायालयाचा निकाल कोट्यवधी हिंदूंच्या अपेक्षेप्रमाणे लागेल, असा विश्वास विश्व हिंदू परिषदेच्या कायदेतज्ज्ञांना वाटतो,' असंही कोकजे यांनी म्हटलं. न्यायालयाचा निकाल श्रद्धेच्या विरोधात गेल्यास देशभरातील हिंदू आंदोलनं सुरू करतील आणि आपापल्या खासदारांवर दबाव आणून त्यांना अयोध्येत राम मंदिर उभारण्यासाठी कायदा संमत करायला लावतील, असं कोकजे यांनी म्हटलं. कोकजे यांच्या या विधानामुळे वाद होण्याची शक्यता आहे.
सामाजिक शांतता, गोहत्येविरोधातील जनजागृती, राम मंदिराची उभारणी, नद्यांचं संरक्षण आणि संवर्धन यासाठी विश्व हिंदू परिषद यापुढेही काम करत राहील, असं कोकजे यांनी सांगितलं. विश्व हिंदू परिषदेला संकुचित म्हणणारे आता मंदिरात जाऊन पूजा करत आहेत, असं म्हणत त्यांनी राहुल गांधींवर अप्रत्यक्ष टीका केली. आम्ही कित्येक वर्षांपासून करत असलेल्या कामाचा हा परिणाम असल्याचा दावाही त्यांनी केला. मोदी सरकारनं गेल्या चार वर्षात राम मंदिराच्या उभारणीसाठी कायदा का मंजूर केला नाही, असा प्रश्न कोकजे यांना पत्रकारांनी विचारला. मात्र त्यांनी यावर थेट भाष्य करणं टाळलं. सर्व गोष्टी सरकार करु शकत नाही, असं कोकजे यांनी म्हटलं.