मशिदीच्या रस्त्यासाठी हिंदूंनी दिली जमीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2018 06:14 AM2018-03-02T06:14:27+5:302018-03-02T06:14:27+5:30
रामजन्मभूमी-बाबरी मशिदीचा वाद धगधगत असलेल्या अयोध्येपासून १५० किलोमीटर अंतरावरील संत कबीरनगर जिल्ह्यातील थवाईपार गावामध्ये मात्र हिंदू-मुस्लिमांचे ऐक्य व सामाजिक सलोख्याचे दर्शन घडविणारी एक आगळी घटना घडली.
फैजाबाद : रामजन्मभूमी-बाबरी मशिदीचा वाद धगधगत असलेल्या अयोध्येपासून १५० किलोमीटर अंतरावरील संत कबीरनगर जिल्ह्यातील थवाईपार गावामध्ये मात्र हिंदू-मुस्लिमांचे ऐक्य व सामाजिक सलोख्याचे दर्शन घडविणारी एक आगळी घटना घडली. या गावातील एका मशिदीकडे मुुस्लिमांना जाणे सुकर व्हावे, यासाठी गावातील हिंदूंनी आपल्या जमिनी त्यांना रस्ता बांधण्यासाठी दान केल्या.
थवाईपार गावचे तत्कालीन सरपंच इन्सान अली यांच्या मालकीच्या जागेवर १९६३ साली ही मशीद बांधण्यात आली. तिथपर्यंत जाण्यास नीट रस्ता नव्हता. २० वर्षांपासून एका अरुंद गल्लीतून व घाण पाण्यातून वाट काढत मशिदीपर्यंत जावे लागे. वेगवेगळ््या लोकांच्या मालकीच्या जागांतून जी वाट जात होती तिचाच वापर होई. गावातील लोकसंख्या वाढली. प्रत्येकाने जागांना कुंपण घालून घेतले. त्यामुळे मशिदीकडे जाणारी वाट बंद झाली. केवळ एक अरुंद गल्ली उरली होती. तिथून ते मशिदीत जाऊ लागले. ही गैरसोय टाळण्यास हिंदूंनी जमीन दिली. (वृत्तसंस्था)
>गावच्या सरंपच उर्मिला देवी व माजी सरपंच ब्रिजेश सिंग तसेच राजेंद्र सिंग, महेंद्र सिंग, कपिलसिंग, नकचेद सिंग अशा सहा हिंदूंनी पुढाकार घेतला. त्यांनी आपल्या मालकीची जमीन मशिदीसाठी मोठा रस्ता बांधण्याकरिता दान केली. त्यातून आता १०० मीटर लांबीचा मोठा रस्ता बांधून पूर्ण झाला आहे. यासंदर्भात अश्फाक या रहिवाशाने सांगितले की, या अनोख्या कृतीमुळे हिंदू-मुस्लिम ऐक्य व सामाजिक सलोख्याचे दर्शन झाले.
>गावातील हिंदू-मुस्लिमांत कधीही तणाव निर्माण झाला नाही. मशिदीकडे जायला मोठा रस्ता हवा याकरिता काही पावले उचलणे आवश्यक होते.