हिंदुंची टक्केवारी घटली, मुस्लीमांची वाढली, केंद्र सरकारचे शिक्कामोर्तब
By admin | Published: August 25, 2015 06:14 PM2015-08-25T18:14:52+5:302015-08-25T18:14:52+5:30
चार वर्षे बासनात बांधून ठेवलेली जनगणना अखेर केंद्र सरकारने जाहीर केली असून मुस्लीम वगळता बाकी सर्व धर्मीयांचा जन्मदर कमी झाल्याचे समोर आले आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २५ - गेली चार वर्षे बासनात बांधून ठेवलेली जनगणना अखेर केंद्र सरकारने जाहीर केली असून मुस्लीम वगळता बाकी सर्व धर्मीयांचा जन्मदर कमी झाल्याचे समोर आले आहे. हिंदुंचा जन्मदर ०.७ टक्क्यांनी घटला आहे, तर मुस्लीमांचा जन्मदर २००१ ते २०११ या दशकात ०.८ टक्क्यांनी वाढला आहे. भारताची २०११ ची लोकसंख्या १२१ कोटी ९ लाख होती. या जनगणनेनुसार भारतातल्या हिंदूंची संख्या ९६ कोटी ६३ लाख (७९.८ टक्के) आहे, मुस्लीमांची संख्या १७ कोटी २२ लाख (१४.२ टक्के) आहे, ख्रिश्चन २ कोटी ७० लाख (२.३ टक्के), शीख २ कोटी ८ लाख (१.७ टक्के), बौद्ध ८४ लाख (०.७ टक्के), जैन ४५ लाख (०.४ टक्के), अन्य धर्मीयांची संख्या ७९ लाख (०.७ टक्के) व कुठलाही धर्म नसलेल्यांची संख्या २९ लाख (०.२ टक्के) असल्याचे समोर आले आहे.
देशाच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत हिंदूंचे प्रमाण ०.७ टक्क्यांनी घटल्याचे व मुस्लीमांचे ०.८ टक्क्यांनी वाढले आहे. शिखांचे लोकसंख्येतील प्रमाण ०.२ टक्क्यांनी तर बौद्धांचे ०.१ टक्क्यांनी घटले असून जैन व ख्रिश्चनांच्या लोकसंख्येच्या तुलनेतील प्रमाणात फारसा बदल झालेला नाही.
२००१ ते २०११ या दशकात हिंदूंची लोकसंख्या १७.७ टक्के दराने वाढली, मुस्लीमांची २४.६ टक्के दराने वाढली, ख्रिश्चनांची लोकसंख्या १५.५ टक्के दराने वाढली, शिखांची ८.६ टक्के दराने वाढली, बौद्धांची ६.१ टक्के दराने वाढली तर जैनांची लोकसंख्या ५.४ टक्के दराने वाढल्याचे जनगणनेत आढळले आहे.