"जे हिंदू मला मत देणार नाहीत, त्यांच्यात 'मियां'चं रक्त"; भाजपा आमदाराचं वादग्रस्त विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2022 11:12 AM2022-02-22T11:12:06+5:302022-02-22T11:23:41+5:30

BJP MLA Raghvendra Pratap Singh : भाजपाच्या एका आमदाराने वादग्रस्त विधान केलं आहे. एका प्रचारसभेत त्यांनी केलेल्या या विधानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.

Hindus who don’t vote for me have Muslim blood, says BJP MLA Raghvendra Pratap Singh | "जे हिंदू मला मत देणार नाहीत, त्यांच्यात 'मियां'चं रक्त"; भाजपा आमदाराचं वादग्रस्त विधान

"जे हिंदू मला मत देणार नाहीत, त्यांच्यात 'मियां'चं रक्त"; भाजपा आमदाराचं वादग्रस्त विधान

Next

नवी दिल्ली - उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीदरम्यान राजकारण चांगलंच तापलं आहे. याच दरम्यान भाजपाच्या एका आमदाराने वादग्रस्त विधान केलं आहे. "जे हिंदू मला मत देणार नाहीत, त्यांच्यात 'मियां'चे रक्त आहे" असं विधान भाजपाचे आमदार राघवेंद्र प्रताप सिंह (BJP MLA Raghvendra Pratap Singh) यांनी केलं आहे. राघवेंद्र सिंह हे उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक लढवत आहेत. एका प्रचारसभेत त्यांनी केलेल्या या विधानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.

"मी पाच दिवसांपूर्वी हे विधान केलं होतं. परंतु ते दुसऱ्या संदर्भात होतं आणि कोणालाही धमकावण्याचा माझा हेतू नव्हता" असं यासंदर्भात इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सिंह यांनी म्हटलं आहे. तसेच व्हिडिओमध्ये आमदारांनी काही अपशब्द वापरल्याचं ऐकू येत आहेत. त्यावर त्यांनी "मला सांगा, कोणी मुस्लिम मला मत देईल का? तेव्हा लक्षात ठेवा की या गावातील हिंदूंनी माझ्याऐवजी दुसऱ्याचे समर्थन केले तर त्यांच्यामध्ये 'मियां'चे रक्त आहे. ते देशद्रोही आहेत. इतके अत्याचार करूनही जर हिंदू तिकडे गेला तर त्याने लोकांसमोर आपले तोंड दाखवू नये" असं म्हटलं आहे.

"हिंदू समाजाला अपमानित करण्यासाठी प्रयत्न कराल तर मी तुम्हाला बर्बाद करून सोडेन"

"…आणि पुन्हा एकदा इशारा देऊन तुम्हाला समजले नाही, तर यावेळी मी सांगेन की राघवेंद्र सिंह कोण आहे. कारण तुम्ही माझा विश्वासघात केला तर चालेल, मी अपमान सहन करून घेईन. पण जर तुम्ही आमच्या हिंदू समाजाला अपमानित करण्यासाठी प्रयत्न कराल तर मी तुम्हाला बर्बाद करून सोडेन" असं राघवेंद्र प्रताप सिंह यांनी आपल्या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून त्याचीच सर्वत्र चर्चा रंगली आहे. 

"कोणालाही धमकावण्याचा माझा हेतू नव्हता"

सिंह यांनी त्यांच्या विधानाची इंडियन एक्सप्रेसशी बोलताना कबुली दिली. पुढे स्पष्टीकरण देत त्यांनी सांगितले की, "मी त्या गोष्टी बोलल्या आहेत, मी नाकारत नाही. पण मी त्या सर्व गोष्टी दुसर्‍या संदर्भात बोललो होतो आणि भूतकाळाशी तुलना करत होतो. कोणालाही धमकावण्याचा माझा हेतू नव्हता. डोमरियागंजमध्ये सुमारे 1.73 लाख मुस्लिम मतदार आहेत, अशा ठिकाणी अशी धमकी देऊन कोणी निवडणूक जिंकू शकते का?" असंही म्हटलं आहे. इंडियन एक्सप्रेसने याबाबतचे वृत्त दिले आहे. 


 

Web Title: Hindus who don’t vote for me have Muslim blood, says BJP MLA Raghvendra Pratap Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.