हिंदुस्थान एअरोनॉटिक्सचे २० हजार कामगार संपावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 04:41 AM2019-10-15T04:41:05+5:302019-10-15T04:41:11+5:30
८ कारखाने पूर्ण बंद; पगारवाढीवरून वाटाघाटी फिसकटल्या
नवी दिल्ली/नाशिक : लष्कराला लागणाऱ्या विमानांचे उत्पादन करणाºया हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) च्या देशभरातील ९ कारखान्यांमध्ये काम करणारे १९ हजार कामगार सोमवारपासून बेमुदत संपावर गेले आहेत. पगारवाढीसह अनेक मागण्यांसाठी त्यांनी संप सुरू केला असून, नाशिकच्या ओझरमधील ३५00 हजार कामगारांचाही त्यात समावेश आहे.
एचएएल ही सरकारी कंपनी असून, ती प्रामुख्याने लष्कराला लागणारी विमाने तयार करते. येथील कामगारांनी ३५ टक्के पगारवाढीची मागणी केली होती. मात्र प्रशासनाने केवळ ८ टक्के वेतनवाढ देण्याचा प्रस्ताव कामगार संघटनेला दिला.
अधिकारी व कामगार यांच्यात विविध भत्त्यांबाबत असलेला भेदभाव दूर करण्यात यावा आणि सर्वांना समान दराने भत्ते मिळायला हवेत, अशीही आमची मागणी असल्याचे कामगार संघटनेचे सरचिटणीस एस. चंद्रशेखर यांनी सांगितले. ते म्हणाले की, वाटाघाटीतून तोडगा निघावा, अशीच आमची इच्छा होती.
आठ टक्के वाढ अमान्य
आम्ही पाच वर्षांच्या वेतन कराराची मागणी केली होती; पण व्यवस्थापनाने दहा वर्षांचा वेतन करार करा, असा आग्रह धरला. तोही आम्ही मान्य केला; पण व्यवस्थापन नव्यानव्या अटी घालून वाटाघाटींमध्ये अडथळे आणत आहेत, असे चंद्रशेखर म्हणाले. अधिकारी वर्गाला ३५ टक्के वाढ आणि कामगारांना केवळ ८ टक्के वाढ असा प्रस्ताव मान्य करणार नाही, असे कामगारांचे म्हणणे आहे.