निवडणुकीला हिंदुत्वाचा रंग! कर्नाटकात हवा भाजपच्या बाजूने नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2023 01:10 PM2023-04-07T13:10:06+5:302023-04-07T13:10:27+5:30
कर्नाटकलाही हिंदुत्त्वात रंगविण्याची तयारी सुरू आहे.
संजय शर्मा, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: कर्नाटक विधानसभा निवडणुकीत विकास व नेतृत्त्वाच्या मुद्द्यावर दिसत असणारी कमजोरी दूर करण्यासाठी हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर आता निवडणूक लढवावी लागेल, असे राज्यात वापसीच्या प्रयत्नात असलेल्या भाजपला प्रकर्षाने वाटत आहे. भाजपचे सर्व मुद्दे विफल होतात, तेव्हा भाजप हिंदुत्त्वाचे कार्ड खेळतो. त्यामुळे आता कर्नाटकलाही हिंदुत्त्वात रंगविण्याची तयारी सुरू आहे.
कर्नाटकात १० मे रोजी मतदान होणार आहे. परंतु, राज्यातील निवडणुकीची हवा अद्याप भाजपच्या बाजूने दिसत नाही. अँटी इन्कम्बन्सी जास्त दिसत असतानाच नेतृत्त्वाची कमजोरीही स्पष्टपणे दिसत आहे. याचमुळे भाजप कर्नाटकातील विद्यमान मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचे नावही घेत नाही तसेच कोणत्या नेत्याला मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्टही करीत नाही. सर्व मुद्दे विफल झालेले पाहून भाजपला अखेर हिंदुत्त्वाला शरण जावे लागले. भाजपच्या आक्रमक निवडणूक मोहिमेत हिंदुत्त्वाच्या मुद्द्याचा आवाजही ऐकायला मिळेल.
असा होईल फायदा...
कर्नाटकातील उत्तर कन्नड, शिवमोगा, उडुपी, चिकमंगळूर, दक्षिण कन्नड या पाच जिल्ह्यांसह किनारपट्टीवरील भागात हिंदुत्त्वाच्या मुद्द्याचा प्रभाव दिसतो. या भागात भाजपला पाठिंबा मिळू शकतो. हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर कर्नाटकातील लिंगायत व वोकलिंगा हे दोन मोठे संप्रदायही भाजपकडे वळू शकतात.
कोण मैदानात?
- उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह, साध्वी निरंजन ज्योती यांच्यासह १२ नेते हिंदुत्त्वाला धार देण्यासाठी निवडणुकीच्या मैदानात उतरत आहेत.
- गोहत्या, धर्मांतर, लव्ह जिहाद, हिजाब, टिपू सुलतान यांसारख्या मुद्द्यांना निवडणुकीचा मुद्दा करण्याचा प्रयत्न होईल.
साडेतीन कोटी जप्त
बेळगाव : महाराष्ट्र, कर्नाटक सीमेवरील कोगनोळी तपासणी नाक्याजवळ गुरुवारी खासगी बसमधील एका प्रवाशाकडून दीड कोटी, तसेच बुधवारी पहाटे हिरेबागेवाडी टोलनाक्यावर खासगी बसमधून नेण्यात येणारी दोन कोटी रुपये, अशी साडेतीन कोटी रुपयांची अवैध रोकड जप्त करण्यात आली. पोलिस आणि निवडणूक विभागाच्या विशेष पथकाने ही कारवाई केली.
काँग्रेसची दुसरी यादी, ४१ उमेदवारांची जाहीर
- पुढील महिन्यात होणाऱ्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने गुरुवारी ४१ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली असून, प्रादेशिक पक्ष सर्वोदय कर्नाटक पक्षासाठी एक जागा सोडली आहे. २२४ सदस्यीय विधानसभेसाठी १० मे रोजी निवडणूक होणार असून १३ मे रोजी निकाल जाहीर होणार आहेत.
- काँग्रेसने सर्वोदय कर्नाटक पक्षाच्या दर्शन पुत्तन्नय्या यांच्यासाठी मेलुकोटे विधानसभा मतदारसंघ सोडला आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेसने १४२ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. भाजप सत्तेत असलेले कर्नाटक हे दक्षिणेकडील एकमेव राज्य असून, येथे काँग्रेस भाजपकडून सत्ता हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत आहे.
मुख्यमंत्रिपदाचा चेहराच नाही
- कर्नाटक विधानसभा निवडणुकीत कोणत्याही नेत्याला मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट केले जाणार नाही. संपूर्ण निवडणूक सामूहिक नेतृत्त्वावरच लढवली जाणार आहे, असे भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी आढावा घेतल्यानंतर निश्चित केले आहे.
- बी. एस. येदीयुरप्पा यांच्यानंतर भाजपला कर्नाटकात तसा दिग्गज नेता मिळत नाही. भाजपने बी. एस. येदीयुरप्पा यांच्या पसंतीनेच बसवराज बोम्मई यांना कर्नाटकचे मुख्यमंत्री केले होते.
- आता मात्र बोम्मई यांचे नाव व काम याचा फायदा होणे तर दूर, उलट नुकसान होताना दिसत आहे.
- याच कारणास्तव कर्नाटकात भाजप केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वावरच निवडणूक लढवणार आहे, असे भाजप नेतृत्त्वाने निश्चित केले आहे.