हिमाचलात जयराम ठाकूरच? नड्डांची शक्यता मावळली; गुजरातेत रुपाणी-नितीन पटेल जोडी कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 01:06 AM2017-12-20T01:06:55+5:302017-12-20T01:07:35+5:30
केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांची हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी निवड होण्याची शक्यता मावळली असून, जयराम ठाकूर यांच्या गळ्यातच ती माळ पडेल, अशी शक्यता दिसत आहे. तसेच गुजरातचे मुख्यमंत्रिपद पुन्हा विजय रुपाणी यांना मिळेल आणि नितीन पटेल हेच उपमुख्यमंत्री होतील, असे दिसत आहे.
हरीश गुप्ता
नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांची हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी निवड होण्याची शक्यता मावळली असून, जयराम ठाकूर यांच्या गळ्यातच ती माळ पडेल, अशी शक्यता दिसत आहे. तसेच गुजरातचे मुख्यमंत्रिपद पुन्हा विजय रुपाणी यांना मिळेल आणि नितीन पटेल हेच उपमुख्यमंत्री होतील, असे दिसत आहे.
हिमाचलमध्ये संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन व केंद्रीय मंत्री नरेंद्र तोमर हे केंद्रीय निरीक्षक म्हणून तेथील ४४ आमदारांची मते जाणून घेणार असले तरी राज्यात प्राबल्य असलेल्या ठाकुरांचा प्रतिनिधी म्हणून जयराम ठाकूर यांनाच मुख्यमंत्री केले जाईल, अशी शक्यता आहे. प्रेमकुमार धुमल, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सत्पाल सट्टी व माजी मंत्री गुलाबसिंग ठाकूर हे पराभूत झाल्यामुळे रा. स्व. संघाची पार्श्वभूमी असलेले व चारदा निवडून आलेले जयराम यांचीच निवड अपेक्षित आहे.
गुजरातमध्ये विजय रुपाणी यांची निवड निश्चित मानली जात आहे. ते अमित शहा यांच्या विश्वासातील असल्याने त्यांच्या नावाला विरोध होण्याची शक्यता दिसत नाही. आनंदीबेन पटेल यांना पदावरून दूर केल्यानंतर अमित शहा यांनीच रुपाणी यांच्यासाठी सारी ताकद लावली होती. आताही तसेच होईल. शिवाय आता ते ५६ हजार मतांनी विजयी झाले आहेत. पाटीदार समाजाला प्रतिनिधित्व देण्यासाठी नितीन पटेल हेच पुन्हा उपमुख्यमंत्री होतील, असे सांगण्यात येते. मात्र तेथेही अर्थमंत्री अरुण जेटली व सरचिटणीस सरोज पांडे केंद्रीय निरीक्षक म्हणून आमदारांचे म्हणणे ऐकून घेणार आहेत.