जनतेचा विश्वास सार्थ ठरवणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 04:50 AM2017-07-26T04:50:48+5:302017-07-26T04:51:00+5:30
माझ्यासारख्या एका सामान्य घरातील व्यक्तीवर देशातील सर्वोच्च पदाची जबाबदारी सोपवून, सव्वाशे कोटी भारतीय नागरिकांनी जो विश्वास टाकला आहे, तो सार्थ करण्याचा मी आटोकाट प्रयत्न करेन
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : माझ्यासारख्या एका सामान्य घरातील व्यक्तीवर देशातील सर्वोच्च पदाची जबाबदारी सोपवून, सव्वाशे कोटी भारतीय नागरिकांनी जो विश्वास टाकला आहे, तो सार्थ करण्याचा मी आटोकाट प्रयत्न करेन, अशी ग्वाही देऊन रामनाथ कोविंद यांनी मंगळवारी भारतीय प्रजासत्ताकाचे १४ वे राष्ट्रपती म्हणून अत्यंत विनम्रतेने पदभार स्वीकारला.
संसद भवनाच्या मध्यवर्ती दालनात झालेल्या दिमाखदार सोहळ््यात सरन्यायाधीश न्या. जगदीश सिंग खेहर यांनी ७१ वर्षीय कोविंद यांना पदाची शपथ दिली. यानंतर, दिल्या गेलेल्या २१ तोफांच्या सलामीने भारताचा नवा राष्ट्रप्रमुख अधिकारावर आल्याची जगाला द्वाही दिली गेली. शपथविधीस प्रथेनुसार मावळते राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती हामीद अन्सारी व लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन कोविंद यांच्यासोबत मुख्य मंचावर होते. समोर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्व केंद्रीय मंत्री, देवेगौडा व डॉ. मनमोहन सिंग हे माजी पंतप्रधान, सर्व राज्यांचे राज्यपाल व मुख्यमंत्री, संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य आणि देशोदेशीचे राजदूत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
शपथग्रहणानंतर छोटेखानी भाषण करून कोविंद यांनी मुखर्जी यांच्यासह उपस्थितांच्या अभिनंदनाचा हात जोडून स्वीकार केला. काही सदस्यांनी ‘जय श्री राम’ आणि ‘भारत माता की जय’ अशा घोषणा दिल्याने कोविंद यांच्या रूपाने भारताला भाजपाचे पहिले राष्ट्रपती मिळाल्याचेही सूचित झाले.
शपथ ग्रहण सोहळ्यानंतर कोविंद यांनी सभागृहातील नेत्यांशी संवाद साधला. त्यानंतर ते राष्ट्रपतींच्या लिमोजीन कारने राष्ट्रपती भवनाकडे रवाना झाले. यावेळी मुखर्जी त्यांच्या डाव्या बाजूला बसले होते. हा ताफा संसद भवनातून राष्ट्रपती भवनाकडे जात असताना हलकासा पाऊस सुरू झाला आणि संपूर्ण परिसर या पावसात चिंब झाला. कोविंद आणि मुखर्जी राष्ट्रपती भवनात पोहोचले आणि कोविंद यांनी रजिस्टरवर हस्ताक्षर करून पदभार स्वीकारला. त्यानंतर प्रणव मुखर्जी यांना नव्या १०, राजाजी मार्ग येथील निवासस्थानी सोडण्यासाठी कोविंद हे मुखर्जी यांच्यासोबत लिमोजीन कारमध्ये गेले.
हा शपथविधी मैलाचा दगड : नरेंद्र मोदी
जन संघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी जो प्रवास सुरू केला
होता, त्यात रामनाथ कोविंद यांचा राष्ट्रपतिपदासाठीचा शपथविधी हा मैलाचा दगड ठरला आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी म्हटले.
भाजपाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोदी यांनी हे भाष्य
भाजपा संसदीय पक्षाच्या येथे
झालेल्या बैठकीत केले. या बैठकीला खासदार व भाजपाचे नेते उपस्थित होते. मुखर्जी यांनी १९५१ मध्ये जन संघाची स्थापना केली होती.
राष्ट्रपती बनलेले कोविंद हे भाजपाचे पहिले नेते ठरले असल्यामुळे, मोदी यांच्या या भाष्याला विशेष महत्त्व आहे.