हृदयद्रावक! मुलीसाठी मुलगा पाहायला जात होतं कुटुंब; काळाने घातला घाला, 5 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2024 09:43 AM2024-05-28T09:43:56+5:302024-05-28T09:45:32+5:30
आपल्या मुलीला मुलगा पाहण्यासाठी सिरसामार्गे हंसीला येत होते.
हरियाणातील हिस्सार येथे रविवारी झालेल्या एका रस्ते अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पाच जणांचे मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. हिसार-दिल्ली रोडवरील सेक्टर 27-28 जवळ रविवारी एका कारचं समोरून ट्रक आल्याने नियंत्रण सुटलं आणि ती उलटली.
या अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले आहेत. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांपैकी तिघे पंजाबमधील भटिंडा जिल्ह्यातील मोड मंडी येथील रहिवासी आहेत. पोलिसांनी 5 मृतदेहांचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले. तसेच ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सर्व लोक आपल्या मुलीला मुलगा पाहण्यासाठी सिरसामार्गे हंसीला येत होते. तपासाच्या आधारे पोलिसांनी सांगितलं की, कार सेक्टर 27-28 वळणावर येताच समोरून भरधाव वेगाने येणारा ट्रकपासून वाचण्याच्या नादात कारवरील नियंत्रण सुटलं.
रणजीत आणि गग्गड सिंग भटिंडाहून सिरसामार्गे हंसीच्या दिशेने त्यांच्या कारने येत होते. सकाळी भटिंडाहून निघाल्यानंतर त्यांनी आधी गग्गड सिंग यांचा मेव्हणा सतपालच्या नातेवाईकाला कालांवलीहून गाडीत बसवलं आणि ते सिरसामार्गे हंसीच्या दिशेने येत होते. त्यांना पंजाबला परत जायचं होतं.
गग्गड सिंह आणि रणजीत यांचं कुटुंब हे त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी मुलगा पाहण्यासाठी हंसीला येत होते. मात्र हंसीला पोहोचण्यापूर्वीच त्यांच्या कारला अपघात झाला. तपास अधिकारी अजायब सिंग यांनी सांगितले की, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ट्रकची ओळख अद्याप पटली नसून पोलीस चालकाची माहिती गोळा करत आहेत.