ऐतिहासिक! नागालँडला ११९ वर्षांनी मिळालं दुसरं रेल्वे स्टेशन; थेट अरुणाचल प्रदेश जोडला जाणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2022 02:55 PM2022-08-27T14:55:50+5:302022-08-27T14:56:58+5:30
शुखोवी रेल्वे स्थानकाची भर पडल्याने आता नागालँड आणि अरुणाचल प्रदेश थेट रेल्वे सेवेने जोडले जातील.
शोखुवी: भारत आपला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना ईशान्य भागातील पर्वतरांगांमध्ये वसलेल्या नागालँड राज्यासाठी ऐतिहासिक दिवस आहे. कारण, तब्बल १०० वर्षांपेक्षा अधिकचा काळ लोटल्यानंतर नागालँडमधील रहिवाशांना दुसरे रेल्वे स्थानक मिळाले आहे. यामुळे नागालँड आणि अरुणाचल प्रदेश थेट जोडला जाणार आहे.
नागालँडमधील नवीन 'शोखुवी रेल्वे स्टेशन'वरून 'डोनी पोलो एक्सप्रेस'ला रवाना झाली. मुख्यमंत्री नेफियू रियो यांनी नव्या 'शोखुवी रेल्वे स्टेशन'वर 'डोनी पोलो एक्सप्रेस'ला हिरवा झेंडा दाखवला. तब्बल ११९ वर्षांहून अधिक काळानंतर नागालँडला दुसरे रेल्वे स्टेशन मिळालं आहे. नागालँडसाठी हा दिवस फार महत्त्वाचा ठरला. नागालँडमधील पहिले रेल्वे स्थानक सुमारे १९०३ मध्ये राजधानी दीमापूर येथे सुरु झाले होते.
नागालँड थेट अरुणाचल प्रदेशला जोडला
डोनी पोलो एक्सप्रेस याआधी आसाममधील गुवाहाटी आणि अरुणाचल प्रदेशातील नाहरलागुन या दरम्यान चालवली जात होती. या एक्सप्रेसच्या थांब्यामध्ये वाढ करत टीमापूरपासून काही किलोमीटर अंतरावर असणाऱ्या शोखुवी रेल्वे स्थानकावरही आता ही एक्स्प्रेस थांबणार आहे. डोनी पोलो एक्सप्रेसच्या मार्गाचा विस्तार करण्यात आला आहे. यामध्ये शुखोवी रेल्वे स्थानकाची भर पडल्याने आता नागालँड आणि अरुणाचल प्रदेश थेट रेल्वे सेवेने जोडले जातील.
दरम्यान, नागालँडचे मुख्यमंत्री नेफियू रिओ यांनी नागालँडसाठी ऐतिहासिक दिवस आहे. राज्याला १०० वर्षांहून अधिक काळानंतर धनसारी-शोखुवी रेल्वे मार्गावर दुसरे रेल्वे टर्मिनल मिळाले आहे, असे म्हटले आहे. ईशान्य फ्रंटियर रेल्वे (NFR) महाव्यवस्थापक अंशुल गुप्ता यांनी यावेळी सांगितले की, भारतीय रेल्वे आणि NFR साठी हा अभिमानाचा क्षण आहे. NFR ईशान्येकडील राज्यांच्या सर्व राजधान्यांना रेल्वेद्वारे जोडण्याचे काम करत आहेत.