भारतासाठी ऐतिहासिक क्षण; 40 वर्षांनंतर भारतीय व्यक्तीची अंतराळात झेप...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 18:09 IST2025-04-03T18:08:40+5:302025-04-03T18:09:59+5:30
भारतीय वायुसेनेचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला मे महिन्यात अंतराळ मोहिमेवर जाणार आहेत.

भारतासाठी ऐतिहासिक क्षण; 40 वर्षांनंतर भारतीय व्यक्तीची अंतराळात झेप...
भारताच्या अंतराळ क्षेत्रासाठी लवकरच एक ऐतिहासिक क्षण येणार आहे. भारतीय हवाई दलातील ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला लवकरच आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचा (ISS) दौरा करणार आहेत. हे मिशन Axiom Mission 4 (Ax-4) अंतर्गत मे महिन्यात प्रक्षेपित केले जाईल. यामध्ये चार देशांतील चार अंतराळवीरांचा समावेश असेल. शुभांशु शुक्ला या मोहिमेअंतर्गत अंतराळात जाणारे पहिले भारतीय ठरणार असून, 40 वर्षांनंतर एखाद्या भारतीयाचे अंतराळात जाण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. यापूर्वी 1984 मध्ये राकेश शर्मा यांनी सोव्हिएत युनियनच्या अंतराळयानातून प्रवास केला होता.
Ax-4 मोहिमेत भारत, पोलंड, हंगेरी आणि अमेरिकेतील अंतराळवीर सहभागी होणार आहेत. या मोहिमेअंतर्गत शुभांशु शुक्ला मिशन पायलट म्हणून अंतराळात जातील. त्यांच्यासोबत पोलंडचे स्लावोज उझनान्स्की आणि हंगेरीचे टिबोर कापू हे मिशन तज्ञ म्हणून सामील होतील. तर, अमेरिकन अंतराळवीर पेगी व्हिटसन या मोहिमेच्या कमांडर असतील. हे मिशन 14 दिवस चालेल, ज्यामध्ये वैज्ञानिक संशोधन आणि तांत्रिक चाचण्या घेतल्या जातील.
ड्रॅगन कॅप्सूलमधून लॉन्चिंग
शुभांशु शुक्ला आणि त्यांचे सहकारी स्पेसएक्सच्या ड्रॅगन कॅप्सूलमधून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जातील. अमेरिकेतील फ्लोरिडा येथील नासाच्या केनेडी स्पेस सेंटरमधून फाल्कन-9 रॉकेटद्वारे हे प्रक्षेपण केले जाणार आहे. NASA आणि Axiom Space यांच्या अंतिम मंजुरीनंतर प्रक्षेपणाची नेमकी तारीख जाहीर केली जाईल.
Ax-4 मिशन काय आहे?
Ax-4 मोहिमेचा मुख्य उद्देश अवकाशात विविध वैज्ञानिक प्रयोग आणि तांत्रिक चाचण्या करणे हा आहे. या अभियानांतर्गत अनेक मोठी कामे केली जाणार आहेत. तेथे सर्व शास्त्रज्ञ सूक्ष्म गुरुत्वाकर्षणातील जैविक आणि भौतिक विज्ञानाशी संबंधित प्रयोग करतील. यासोबतच तेथे तांत्रिक चाचण्याही घेण्यात येणार आहेत. या काळात नवीन अवकाश तंत्रज्ञान आणि उपकरणांची चाचणी घेतली जाईल. या मोहिमेअंतर्गत पृथ्वीवरील लोकांना अंतराळ विज्ञान आणि संशोधनाबाबत जागरूक केले जाईल.
चौथे खाजगी उड्डाण
Axiom Space ही एक खाजगी अमेरिकन स्पेस कंपनी आहे, जी भविष्यात व्यावसायिक अंतराळ स्थानक स्थापन करण्याच्या योजनांवर काम करत आहे. Axiom ने आतापर्यंत तीन अंतराळ मोहिमा यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत. Axiom-1 मिशन एप्रिल 2022 मध्ये प्रक्षेपित करण्यात आले होते, ज्यामध्ये 17 दिवसांची अंतराळ मोहीम आयोजित करण्यात आली होती. यानंतर, मे 2023 मध्ये Ax-2 मिशन आणि जानेवारी 2024 मध्ये Ax-3 मिशन यशस्वीरित्या प्रक्षेपित करण्यात आले. आता Ax-4 मिशन हा या मालिकेतील चौथा टप्पा आहे, ज्यामध्ये भारतासह चार देशांतील अंतराळवीर सहभागी होणार आहेत.
भारतासाठी मोठी उपलब्धी
शुभांशु शुक्ला यांची ही मोहीम भारताच्या अंतराळ संशोधनासाठी मोठी झेप ठरणार आहे. 40 वर्षांनंतर एक भारतीय अंतराळात जाणार आहे. यामुळे देशाची वैज्ञानिक प्रतिष्ठा तर वाढेलच, पण भविष्यात गगनयान मोहिमेसाठी आणि इतर अंतराळ मोहिमांसाठी नवीन शक्यता उघडतील. या मोहिमेमुळे भारताला जागतिक अंतराळ संशोधन आणि व्यावसायिक अंतराळ प्रवासात महत्त्वाची भूमिका बजावण्याची संधी मिळणार आहे.