जय हो! चांद्रयान-२ चे उद्या चंद्रावर ऐतिहासिक लँडिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2019 07:14 AM2019-09-06T07:14:16+5:302019-09-06T07:14:23+5:30
Chandrayaan 2 Landing : संपूर्ण देशाला उत्सुकता : शास्त्रज्ञांचे मनोबल वाढविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रोमध्ये हजर राहणार
निनाद देशमुख
बंगळुरू : अनेक महत्त्वाचे टप्पे पार पाडत भारताचे महत्त्वाकांक्षी चांद्रयान-२ अखेर चंद्राजवळ पोहोचले आहे. चंद्रापासून अवघ्या ३५ किलोमीटरवर असलेले यान शनिवारी पहाटे १.३० ते २.३० च्या दरम्यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरून इतिहास रचेल. येथील डीप स्पेस सेंटरमधील अँटिनाद्वारे यानाचे नियंत्रण सुरू आहे. इस्रोच्या शास्त्रज्ञांचे मनोबल वाढविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत.
चंद्रावर पाणी व खनिजांचा शोध घेण्यासाठी इस्रोने या २ मोहिमेची आखणी केली. त्यानुसार आॅरबिटर, विक्रम लँडर व प्रज्ञान रोव्हर असलेले चांद्रयान-२ भारतीय बनावटीचे बाहुबली प्रक्षेपास्त्र जीएसलव्ही मार्क ३ ने २२ जुलैला अवकाशात पाठविले. पृथ्वीभोवतीच्या सहा दीर्घवतुर्ळाकार फेऱ्या पूर्ण करून ते १४ आॅगस्टला चंद्राच्या दिशेने गेले.
दुसरा टप्पा २० आॅगस्टला पूर्ण झाला आणि २२ आॅगस्टला एल १४ कॅमेºयाने चंद्राची छायाचित्रे पाठवून यान उत्तम काम करीत असल्याचे सिद्ध केले. यानाच्या टेरेन मॅपिंग कॅमेºयाने २६ आॅगस्टला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील विवरांचे छायाचित्र पाठविले आणि २८ व ३० आॅगस्टला अनुक्रमे तिसरी व चौथी फेरी पूर्ण केली.
१ सप्टेंबरला ५ वी फेरी पूर्ण केल्यावर सोमवारी २ तारखेला आॅरबिटरपासून विक्रम लँडर यशस्वीरीत्या वेगळे केले. इस्रोच्या शास्त्रज्ञांनी ही किचकट प्रक्रिया नीट पार पाडली.
३ तारखेला विक्रम लँडर चंद्राच्या अधिक जवळ जात १०४ बाय १२८ किलोमीटर दीर्घ वतुर्ळाकार कक्षेत पोहोचले. बुधवारी विक्रम लँडरची भ्रमण कक्षा कमी करीत ३५ कि.मी.पर्यंत आणली.
विक्रम लँडरने बुधवारी मोहिमेच्या शेवटच्या कक्षेत प्रवेश केला
च्शनिवारी रात्री १ वाजून ५५ मिनिटांनी विक्रम लँडर चंद्रावर उतरविण्यासाठी मुख्य इंजिन सुरू होईल. यानाचे नियंत्रण इस्रोच्या बंगळुरू येथील टेलिमेंट्री ट्रेकिंग कमांड नेटवर्क आणि व्यावलू येथील डीप स्पेस सेंटर येथील केंद्रातून होत आहे. विक्रम लँडरपुढे चंद्रावर उतरताना मोठे आव्हान असणार आहे चंद्रावरील धुळीचे.
च्चंद्रावरील मेंझिनिस सी आणि सिम्पेलिअस एन या दोन विवरांच्या मध्ये असणाºया सपाट भागी यान उतरविले जाणार आहे.
च्यानाचे लँडिंग झाल्यावर दोन तासांनी म्हणजे ५.३० ते ६.३० च्यादरम्यान विक्रम लँडरमधून प्रग्यान रोव्हर बाहेर पडेल. हा काळ शास्त्रज्ञांसाठी आव्हान ठरणार आहे.
‘२००८ मध्येही अनुभवला मानसिक ताण’
बंगळुरू : ‘चांद्रयान-२’चे लँडर विक्रम शनिवारी पहाटे चंद्रावर अलगदपणे उतरण्याच्या क्षणाची भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) श्वास रोखून वाट बघत आहे. अशीच अस्वस्थता किंवा मानसिक ताण निर्माण करणारा अनुभव २००८ मध्ये भारताच्या पहिल्या चांद्र मोहिमेच्या वेळीही होता, असे वरिष्ठ अंतराळ शास्त्रज्ञाने
सांगितले.
चांद्रयान-१ अवकाशात सोडले त्या दिवशी इस्रोने ‘फारच कठीण परिस्थिती’ला तोंड दिले, कारण त्या दिवशी हवामान फार म्हणजे फार वाईट होते, असे त्या मोहिमेचे प्रकल्प संचालक डॉ. एम. अण्णादुराई यांनी गुरुवारी सांगितले. ते म्हणाले, ‘आम्ही वेळेशी स्पर्धा करीत होतो.
उड्डाणासाठी ती शेवटची तारीख होती. आम्हाला काही तांत्रिक अडचणींना दूर करावे लागले आणि श्रीहरीकोटा अंतराळ तळावर हवामान तर फार फार वाईट होते. प्रत्येक जण अस्वस्थ होता; परंतु सुदैवाने अर्ध्या तासासाठी हवामान स्वच्छ झाले; पण त्यानंतर प्रचंड वादळ आले. उड्डाणाची वेळ ही खरोखरीच मानसिक ताण निर्माण करणारी होती.’
2013
मध्ये सुरू केलेल्या ‘मंगळयान’ या मोहिमेचे अण्णादुराई हे कार्यक्रम संचालक होते. चांद्रयान-२ मोहिमेचे वर्णन त्यांनी भारताच्या अंतराळ प्रवासातील आणखी एक मैलाचा दगड अशा शब्दांत केले. चंद्राच्या आजपर्यंत न शोधण्यात आलेल्या दक्षिण ध्रुवावर विक्रम उतरणार आहे.
आम्ही जे काम हाती घेतले ते पुढे नेले आहे. भारतीय अंतराळ प्रवासातील हा आणखी एक मैलाचा दगड ठरला असून, आम्ही मागे पडत नसून पुढे जात आहोत व आंतरराष्ट्रीय वर्तुळात पुढेच जात आहोत. त्यामुळे हा समाधानाचा क्षण आहे, असे ते म्हणाले.
चांद्रयान-१, चांद्रयान-२ आणि मंगळयान या मोहिमांचा हेतू युवा पिढीने मूलभूत विज्ञानाचा अभ्यास करावा आणि भारतीय अंतराळ उद्योगाचा विकास करावा हादेखील असल्याचे अण्णादुराई म्हणाले. या अशा मोहिमांमध्ये मिळालेल्या यशामुळे भारताची त्या मोहिमांच्या व्यवस्थापनात प्रतिष्ठा वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.