ऐतिहासिक क्षण! देशाच्या नौदलात पहिल्यांदाच ३४१ महिला अग्निवीर रुजू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2022 08:33 AM2022-12-04T08:33:07+5:302022-12-04T08:33:21+5:30
२०४७ पर्यंत नौदल आत्मनिर्भर होईल. आम्ही हिंद महासागरात चीनच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहोत असं नौदल प्रमुख ॲडमिरल आर. हरी कुमार यांनी सांगितले.
नवी दिल्ली : नौदलात प्रथमच महिलांना सहभागी करून घेण्यात आले आहे, अशी माहिती नौदल प्रमुख ॲडमिरल आर. हरी कुमार यांनी दिली. अग्निवीर योजनेंतर्गत ३४१ महिला नौदलात दाखल झाल्या आहेत. पुढील वर्षीपासून नौदलात महिला अधिकाऱ्यांनाही सहभागी करून घेण्यात येणार आहे. आतापर्यंत नौदलात एकूण ३ हजार अग्निवीर सहभागी झाले.
नौदल दिनानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत आर. हरी कुमार म्हणाले, आता नौदलातील सर्व शाखा सर्वांसाठी खुल्या राहतील. याशिवाय २०२३ मध्ये सर्व शाखांमध्ये महिला अधिकाऱ्यांना सहभागी करून घेण्यात येणार आहे. नौदल प्रमुख हरी कुमार यांनी सरकारला आश्वासन दिले की, २०४७ पर्यंत नौदल आत्मनिर्भर होईल. आम्ही हिंद महासागरात चीनच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहोत. भारत-चीनमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताकडून आपले नेटवर्क मजबूत करण्यात येत आहे.
हरी कुमार यांनी सांगितले की, चीनवर लक्ष ठेवण्यासाठी भारत आता अमेरिकेकडून ड्रोन खरेदी करण्याची तयारी करीत आहे. ३ बिलियन अमेरिकी डॉलर खर्च करून भारत ३० एमक्यू-९ बी प्रिडेटर ड्रोन खरेदी करणार आहे. एमक्यू-९ बी ड्रोन हे एमक्यू-९ रीपरचा एक प्रकार आहे. यानेच अल-कायदाचा म्होरक्या अयमान अल जवाहिरी याला ठार मारले होते. २०२० मध्ये भारतीय नौदलाने हिंद महासागरात पाळत ठेवण्यासाठी जनरल एटोमिक्सकडून दोन एमक्यू-९ बी सी ड्रोन एक वर्षासाठी भाड्याने घेतले होते आणि नंतर त्याची मुदत वाढविली होती. हिंद महासागरातील वाढत्या चिनी कारवाया पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. तीनही दलांना म्हणजे, लष्कर, हवाई दल आणि नौदल यांना प्रत्येकी १० ड्रोन मिळण्याची शक्यता आहे.