केंद्राचा नागा संघटनेसोबत ऐतिहासिक शांतता करार
By Admin | Published: August 3, 2015 11:35 PM2015-08-03T23:35:02+5:302015-08-03T23:56:26+5:30
ईशान्येकडील राज्यांमधील हिंसाचार रोखत शांतता प्रस्थापित करण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकताना केंद्र सरकारने सोमवारी नॅशनल सोशालिस्ट कौन्सिल आॅफ नागालँड
नवी दिल्ली : ईशान्येकडील राज्यांमधील हिंसाचार रोखत शांतता प्रस्थापित करण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकताना केंद्र सरकारने सोमवारी नॅशनल सोशालिस्ट कौन्सिल आॅफ नागालँड (एनएससीएन-इसाक मुईवा) या नागा अतिरेकी संघटनेसोबत ऐतिहासिक शांती करारावर स्वाक्षरी केली. या करारामुळे गेल्या सहा दशकांपासून ईशान्येत धुमसत असलेला हिंसाचार संपुष्टात येऊन समृद्धीचा मार्ग प्रशस्त होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७ रेसकोर्स या निवासस्थानी आयोजित एका कार्यक्रमात या संघटनेच्यावतीने टी. मुईवा याने तर केंद्रातर्फे सरकारी मध्यस्थ आर.एन. रवी यांनी स्वाक्षरी केली. याप्रसंगी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, लष्करप्रमुख जन. दलबीरसिंग तसेच वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि नागा नेते उपस्थित होते.
‘इतरांसाठी प्रेरणास्रोत बनावा’
हिंसाचाराचा मार्ग अवलंबणाऱ्या अन्य लोकांसाठी हा करार एक प्रेरणास्रोत बनेल. नागा नेते आणि नागालँडच्या जनतेने आमच्या सरकारवर विश्वास दाखविला असून तो प्रत्यक्षात उतरविण्यासाठी आम्ही पूर्ण शक्ती लावू, अशी ग्वाहीही मोदींनी याप्रसंगी छोटेखानी भाषणात दिली.
डोवाल यांची केंद्रवर्ती भूमिका
सर्व ईशान्येकडील म्हणजे मणिपूर, अरुणाचल प्रदेश आणि आसाममधील नागांचे वास्तव्य असलेल्या सर्व भूभागाचे एकत्रीकरण करण्याची या गटाची मुख्य मागणी मान्य झाली किंवा नाही, ते स्पष्ट होऊ शकले नाही.
या कराराचा विस्तृत आराखडा जारी केला जाणार असल्याचे अधिकृत सूत्रांनी नमूद केले. डोवाल यांनी हा करार प्रत्यक्षात आणण्यात केंद्रवर्ती भूमिका बजावल्याचे सांगण्यात आले. (लोकमत न्यूज नेटवर्क)