निवडणुका जिंकण्यासाठी भाजपाचा दंगली घडविण्याचा इतिहास - राष्ट्रवादी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2019 12:34 PM2019-05-16T12:34:33+5:302019-05-16T12:35:41+5:30
पराभव समोर दिसत असल्याने भाजपा मुद्दाम आणीबाणीसदृश्य परिस्थिती निर्माण करत आहे. येत्या काळात भाजपाने औपचारिक आणीबाणी जाहीर केली तर आश्चर्य वाटायला नको
मुंबई - पश्चिम बंगालमध्ये झालेला हिंसाचारावरुन राष्ट्रवादी काँग्रेसकडूनभाजपावर निशाणा साधला आहे. निवडणुका जिंकण्यासाठी भाजपा दंगली घडवते हा आजपर्यंतचा इतिहास आहे. पश्चिम बंगालमध्ये घडलेला हिंसाचार हा भाजपाप्रेरित असल्याचे वेगवेगळ्या पुराव्यांवरून स्पष्ट होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे.
जयंत पाटील यांनी ट्विट करत पश्चिम बंगालमधील हिंसाचार भाजपाने घडविला असल्याची शक्यता वर्तवली आहे. या ट्विटमधून जयंत पाटील यांनी लिहिलंय की, पंडित विद्यासागर यांच्या पुतळ्याची विटंबना भाजपा कार्यकर्त्यांनी केल्याचे व्हिडियोमध्ये स्पष्ट दिसत आहे. पराभव समोर दिसत असल्याने भाजपा मुद्दाम आणीबाणीसदृश्य परिस्थिती निर्माण करत आहे. येत्या काळात भाजपाने औपचारिक आणीबाणी जाहीर केली तर आश्चर्य वाटायला नको असा टोला त्यांनी भाजपाला लगावला आहे.
पराभव समोर दिसत असल्याने भाजपा मुद्दाम आणीबाणीसदृश्य परिस्थिती निर्माण करत आहे. येत्या काळात भाजपाने औपचारिक आणीबाणी जाहीर केली तर आश्चर्य वाटायला नको.#WestBengalClashes#WestBengal
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) May 16, 2019
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या रोड शो दरम्यान मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर पश्चिम बंगालमधील राजकारण तापू लागलं होतं. भाजपा कार्यकर्ते आणि टीएमसीचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्यामुळे निवडणुकीच्या वातावरणात तणाव निर्माण झाला आहे. पश्चिम बंगालमधील या हिंसाचारानंतर भाजपाकडून तृणमूल काँग्रेसवर आरोप करत घडलेला प्रकार हा टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी केला असून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पराभव दिसत असल्याचे असे प्रकार घडवले जात आहेत असा आरोप केला. तर ममता बॅनर्जी यांनी भाजपाने बाहेरच्या राज्यातील गुंडांना घेऊन पश्चिम बंगालमध्ये दंगल पसरविण्यासाठी हे षडयंत्र रचल्याचं सांगितले.
पश्चिम बंगालमध्ये भाजपा आणि तृणमूल काँग्रेसमधील राड्याच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने प्रचारावर एक दिवस आधीच बंदी आणली आहे. त्यामुळे आज पश्चिम बंगालमधील निवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. बंगालमधील डमडम, बारासात, बशिरहाट, जयनगर, मथुरापूर, डायमंड हार्बर, जादवपूर, कोलकाता दक्षिण व कोलकाता उत्तर या नऊ ठिकाणी येत्या रविवारी मतदान आहे. प्रथेप्रमाणे तिथे प्रचार त्याच्या ४८ तास आधी म्हणजे १७ मे रोजी सायंकाळी बंद होणार होता. मात्र आता येथील जाहीर प्रचार १६ मेच्या (गुरुवार) रात्री १० पासूनच बंद करण्याचा आदेश आयोगाने दिले आहेत.
मोदी, शहांसमोर निवडणूक आयोगाची शरणागती, काँग्रेसचा गंभीर आरोप https://t.co/GmkYDEjTuN
— Lokmat (@MiLOKMAT) May 16, 2019