इतिहासाची पाने... इंदिरा गांधी यांच्या हत्येने देश हादरला!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2019 05:20 AM2019-03-26T05:20:58+5:302019-03-26T05:25:01+5:30

जनता पक्षाचा प्रयोग पूर्णत: फसला. भारतीय मतदारांची घोर निराशा झाली. देश प्रथमच मध्यावधी निवडणुकांना सामोरे जात होता. जनता पक्षाची शकले झाली होती. याचा इंदिरा काँग्रेसने पुरेपूर लाभ उठविला.

History of India ... Indira Gandhi assassinated by the country! | इतिहासाची पाने... इंदिरा गांधी यांच्या हत्येने देश हादरला!

इतिहासाची पाने... इंदिरा गांधी यांच्या हत्येने देश हादरला!

googlenewsNext

- वसंत भोसले

जनता पक्षाचा प्रयोग पूर्णत: फसला. भारतीय मतदारांची घोर निराशा झाली. देश प्रथमच मध्यावधी निवडणुकांना सामोरे जात होता. जनता पक्षाची शकले झाली होती. याचा इंदिरा काँग्रेसने पुरेपूर लाभ उठविला. इंदिरा गांधी यांनी देशाच्या एकात्मतेसाठी आणि स्थैर्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले. त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला. ३५३ जागा जिंकत पुन्हा काँग्रेस सत्तेवर आली. संजय गांधी यांचा दबदबाही वाढला होता. मात्र, सहा महिन्यांतच २३ जून १९८० रोजी विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला. इंदिरा गांधी यांना हा मोठा धक्का होता. राजीव गांधी पायलट म्हणून नोकरी करीत होते. त्यांना राजकारणाची अजिबात आवड नव्हती. संजय गांधी मात्र पूर्वीपासूनच इंदिरा गांधी यांना साथ देत राजकारणात होते. किंबहुना त्यांचा पक्षात तसेच सरकारमध्ये मोठा दबदबा होता. त्याच जोरावर त्यांनी आणीबाणीत लोकसंख्या नियंत्रणासाठी कुटुंब नियोजनाची सक्ती करण्याचा प्रयत्न केला. झोपडपट्ट्या निर्मूलनाचा कार्यक्रम राबविला. हे दोन्ही विषय प्रचंड वादग्रस्त ठरले होते. संजय गांधी यांच्या निधनाने खचलेल्या इंदिरा गांधी यांच्या मदतीला येण्यासाठी त्यांचे मोठे चिरंजीव राजीव गांधी यांनी राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. दरम्यानच्या काळात देशाला दोन मोठ्या समस्यांनी घेरले.

पंजाबमध्ये स्वतंत्र खलिस्तानसाठी सशस्त्र संघर्ष सुरू झाला आणि आसाममध्ये परकीय नागरिकांविरुद्ध विद्यार्थ्यांची मोठी चळवळ मूळ धरू लागली. या दोन्ही घटनांनी देश हादरून गेला. दोन्ही घटनांना धार्मिक बाजूही होत्या. पंजाब तर दहशतवादी कारवायांनी पेटला गेला होता. दररोज कोठे ना कोठे दहशतवाद्यांचे हल्ले होत होते. जर्नेलसिंग भिंद्रनवाले यांच्या नेतृत्वाखाली आणि परकीय नागरिकांच्या मदतीने सशस्त्र उठाव करण्याच्या तयारीत दहशतवादी होते. अमृतसरमधील सुवर्णमंदिरात त्यांचा अड्डा होता. जर्नेलसिंग भिंद्रनवाले तेथेच लपून बसला होता. अखेर ३ जून १९८४ रोजी लष्करी कारवाई करण्याचा आणि दहशतवाद मोडून काढण्याचा निर्णय घेण्यात आला. केवळ पाच दिवसांत लष्कराने दहशतवाद्यांचा खात्मा केला. भिंद्रनवाले यात मारला गेला. ‘आॅपरेशन ब्लूस्टार’ असे या कारवाईला नाव देण्यात आले होते. हा मोठा विजय होता. संपूर्ण देशाला या दहशतवादाने ग्रासले होते. असंख्य नेते, लष्करी अधिकारी, पोलीस, सामान्य नागरिक या दहशतवाद्यांनी मारले होते.

आसाममधील वांशिक दंगलीसुद्धा देशाच्या राजकारणावर परिणाम करणाऱ्या ठरल्या होत्या. परकीय नागरिकांची हकालपट्टी करा, यासाठी मूळ आसामी विद्यार्थी युवकांनी हे आंदोलन हाती घेतले होते. त्यांची नावे मतदारयाद्यांतून वगळा, अशी प्रमुख मागणी होती. ही मागणी धुडकावून लावत १९८३ मध्ये आसाम विधानसभेच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या. त्याला प्रचंड विरोध करीत पूर्व बांगलादेशातून आलेल्या परकीय विशेष करून मुस्लिम नागरिकांवर सशस्र हल्ले करण्यात आले. १८ फेब्रुवारी १९८३ ची पहाट महाभयानक होती. केवळ सहा तासांच्या हिंसाचारात नगाव जिल्ह्यातील नेल्लीई या परिसरात २१९१ परकीय नागरिकांची हत्या करण्यात आली. हा आकडा याहूनही मोठा होता, असे सांगण्यात येते. सरकारी यंत्रणा दूरवरच्या खेड्यापाड्यात पोहोचलीच नाही. त्यामुळे मृतांचा नेमका आकडा समजलाच नाही. तो दहा हजारांपर्यंतही असावा, असे मानले जाऊ लागले होते.

आसाम आणि पंजाबच्या हिंसाचाराने अंतर्गत कायदा-सुव्यवस्थेवरून देश प्रचंड अस्वस्थ झाला होता. मात्र, दोन्ही ठिकाणी चर्चेने पर्याय निघालाच नाही. अखेर लष्करी कारवाई करण्यात आली. इंदिरा गांधी यांनी कठोर निर्णय घेतला. आसाम नंतरच्या काळात शांत झाला. पंजाबमधील कारवाईने शीख समाज अस्वस्थ होता. इंदिरा गांधी यांची ३१ आॅक्टोबर १९८४ च्या सकाळी ९.३० वाजता आयरिश टेलिव्हिजनसाठी मुलाखत घेण्यात येणार होती. १ सफरदजंग मार्गावरील निवासस्थानाच्या हिरवळीवर ही मुलाखत होणार होती. त्यासाठी जात असताना त्यांचे अंगरक्षक बियांतसिंग आणि सतवंतसिंग यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. एकूण ३१ गोळ्या झाडण्यात आल्या. त्या जमिनीवर कोसळल्या. त्यांना तातडीने अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत हलविण्यात आले. त्यांची तपासणी करण्यात आली. मात्र, तत्पूर्वीच त्यांचे निधन झाले होते. पंतप्रधानांची हत्या हा भारतीय लोकशाही व्यवस्थेतील मोठा हादरा होता. या घटनेनंतर दिल्लीसह अनेक ठिकाणी शीखविरोधी दंगली झाल्या. त्यात हजारो लोक मारले गेले.

Web Title: History of India ... Indira Gandhi assassinated by the country!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.