इतिहासाची पाने... जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाचा विजय
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2019 04:05 AM2019-03-16T04:05:27+5:302019-03-16T04:06:10+5:30
‘या निवडणूक प्रचारादरम्यान ते झोपले त्यापेक्षा जास्त वेळ प्रवास केला; आणि जेवढा प्रवास केला त्यापेक्षा अधिक जास्त बोलले,’ असे वर्णन केले गेले होते. त्यांचे दर्शन व्हावे यासाठी तासन्-तास लोक रस्त्याच्या दुतर्फा उभे राहिलेले असायचे.
- वसंत भोसले
भारतीय राज्यघटना स्वीकारल्यानंतरही लोकसभेची पहिली निवडणूक घेण्यास पावणे दोन वर्षे लागली होती. भारत-पाकिस्तान फाळणीनंतरचा भारत सव्वीस प्रांतांमध्ये विभागला होता. मतदार याद्या तयार नव्हत्या आणि राखीव जागांचे धोरण निश्चित नव्हते. त्यामुळे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी स्वतंत्र मतदारसंघ राखीव ठेवण्याऐवजी एकाच मतदारसंघातून खुल्या प्रवर्गाचा एक अणि अनुसूचित जाती किंवा जमातीचा एक अशा काही मतदारसंघांत उमेदवार उभे करण्याची सोय केली होती. पश्चिम बंगालमधील एका मतदारसंघातून तर तीन उमेदवारच निवडून द्यायचे होते. ४८९ सदस्य निवडीसाठी दि. २५ आॅक्टोबर १९५१ ते दि. २१ फेबु्रवारी १९५२ दरम्यान निवडणुका पार पडल्या. काँग्रेसचा प्रभाव आणि पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वास आव्हान देणारे समोर कोणी नव्हतेच.
ही निवडणूक पंडित जवाहरलाल नेहरू आणि १७ कोटी मतदारांचीच होती. त्यांचा इतका विलक्षण प्रभाव होता की, राष्ट्रीय नेतृत्व म्हणजे काय; याची प्रचिती येत होती. खाण कामगार, शेतमजूर, दलित, आदिवासी, मध्यमवर्ग ते कारखान्यात काम करणारा कामगारवर्ग, सर्व जण त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित झालेले होते. महिलावर्गाला तर नेहरू कमालीचे आवडायचे. या निवडणुकीत त्यांनी देशाचा कानाकोपरा पिंजून काढला होता. त्यांनी एकूण २५ हजार मैलांचा प्रवास केला. त्यापैकी १८ हजार मैल विमानाने, ५२०० मैल गाडीने, १६०० मैल रेल्वेने आणि ९० मैल बोटीने प्रवास केला होता. त्यांनी ३०० मोठ्या सभा घेतल्या होत्या.
या निवडणुकीत १७ कोटी ३२ लाख मतदारांपैकी ४४.८७ टक्के मतदारांनी मतदान केले. काही राज्यांत २५ टक्के तर काही राज्यांत ६० टक्क्यांपर्यंत मतदान झाले होते. ४८९ उमेदवार निवडायचे होते. त्यासाठी काँगे्रस पक्षाने सर्वाधिक ४७९ उमेदवार उभे केले होते. त्यापैकी ३६४ जण निवडून आले. १० टक्के जागा जिंकून विरोधी पक्षाचे स्थान पटकाविण्यासाठी विरोधकांना ४८ जागाही मिळाल्या नाहीत. भारतीय कम्युनिस्ट पक्षाला १६ जागा मिळाल्या होत्या आणि ३६ अपक्ष उमेदवार विजयी झाले होते. ‘लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि विकास’ हा काँग्रेसचा नारा होता.
पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संपूर्ण निवडणूक आपल्याभोवती खिळवून ठेवली होती. एका ठिकाणी वर्णन केले आहे की, बहुतेक सगळ्या ठिकाणची शहरे, गावे, खेडी किंवा रस्त्यांवरच्या थांब्यावरसुद्धा लोक रात्रभर बसून त्यांचे स्वागत करत होते. शाळा, दुकाने बंद ठेवली जात होती. शेतकरी किंवा कामगार कामे बंद ठेवून पंडित नेहरूंना बघण्यासाठी सुट्टी घेत होते. त्यांच्या प्रभावामुळे विरोधकांची दाणादाण उडाली होती. भारतीय जनसंघाने ९४ उमेदवार उभे केले होते. त्यापैकी पश्चिम बंगालमधून दोन आणि राजस्थानमधून एक जण विजयी झाला होता. पंडित नेहरू स्वत: अलाहाबाद पूर्व मतदारसंघातून (सध्याचा फुलपूर) निवडून आले होते. महाराष्ट्रातील ४५ पैकी ४० जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या. हा सर्व पहिल्या निवडणुकीतील पंडित नेहरू यांचाच सामना त्यांनीच उभ्या केलेल्या नव्या भारताच्या स्वप्नाशी होता.