इतिहास रचत कर्नल गीता राणा झाल्या ‘कमांडर’, सन्मान मिळवणाऱ्या देशातील पहिल्या महिला अधिकारी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2023 06:54 AM2023-03-10T06:54:09+5:302023-03-10T06:54:47+5:30
अलीकडेच भारतीय लष्कराने महिला अधिकाऱ्यांना कमांडरची भूमिका स्वीकारण्यास मान्यता दिली आहे.
नवी दिल्ली : पूर्व लडाखच्या आघाडीवर क्षेत्रीय कार्यशाळेचे (फिल्ड वर्कशॉप) ‘कमांडर’ म्हणून नेतृत्व करून भारतीय लष्करातील कर्नल गीता राणा यांनी इतिहास रचला आहे. असा पराक्रम करणाऱ्या भारतीय लष्कराच्या त्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. अलीकडेच भारतीय लष्कराने महिला अधिकाऱ्यांना कमांडरची भूमिका स्वीकारण्यास मान्यता दिली आहे. त्यानंतर कर्नल गीता हे यश मिळवणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. कर्नल गीता चीन सीमेवर तैनात असलेल्या स्वतंत्र क्षेत्रीय कार्यशाळेचे नेतृत्व करणार आहेत.
लष्कराने अलीकडेच अभियंत्यांची तुकडी, आयुधे, इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकॅनिकल अभियंते आणि इतर शाखांमध्ये स्वतंत्र युनिट्सचे नेतृत्व करण्यासाठी महिला लष्करी अधिकाऱ्यांना १०८ रिक्त जागा सोडल्या आहेत. आगामी काळात इतर महिला लष्करी अधिकाऱ्यांनाही अशा नियुक्त्या दिल्या जाऊ शकतात. त्यांना मंडळांकडून मान्यता मिळू शकेल आणि त्यांना नेतृत्वाची भूमिका देता येईल. भविष्यात त्यांना उच्च पदांवर नियुक्ती दिली जाऊ शकते.
ग्रुप कॅप्टन शालिजा लढाऊ युनिटचे नेतृत्व करणार
भारतीय हवाई दलाने एक ऐतिहासिक निर्णय घेत ग्रुप कॅप्टन शालिजा धामी यांची पश्चिम सेक्टरच्या आघाडीवरील लढाऊ युनिटचे नेतृत्व करण्यासाठी निवड केली आहे. हवाई दलाच्या इतिहासात प्रथमच एका महिला अधिकाऱ्याला या युनिटचे नेतृत्व देण्यात आले आहे. पश्चिमेकडील क्षेत्र भारत-पाकिस्तान सीमा क्षेत्रात येते.
असाही सन्मान
२००३ मध्ये भारतीय हवाई दलात दाखल झालेल्या शालिजा सध्या हवाई दलाच्या फ्रंटलाइन कमांड मुख्यालयाच्या ऑपरेशन्स शाखेत कार्यरत आहेत. फ्लाइंग ब्रँचमध्ये कायमस्वरूपी कमिशन मिळालेल्या त्या पहिल्या महिला अधिकारी आहेत. त्या चेतक आणि चित्ता हेलिकॉप्टर चालवतात. त्यांना २,८०० तासांपेक्षा जास्त उड्डाणाचा अनुभव आहे.
- भारतीय लष्कर मित्र देशांसोबतच्या लष्करी सरावांमध्ये महिला सैनिकांनाही सहभागी करून घेत आहे. यासोबतच महिला लष्करी अधिकाऱ्यांनाही शांती मोहिमेसाठी पाठवले जात आहे.
- लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे महिला अधिकाऱ्यांना सर्व संधी देण्याच्या बाजूने आहेत. लवकरच लष्करातील तोफखाना रेजिमेंटमध्ये महिला लष्करी जवानांचीही नियुक्ती होऊ शकते.