अण्णाद्रमुकमध्ये इतिहासाची पुनरावृत्ती, दुस-यांदा पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर
By admin | Published: February 15, 2017 11:55 AM2017-02-15T11:55:04+5:302017-02-15T11:55:04+5:30
तामिळनाडू सिनेजगतात सुपरस्टार राहिलेल्या एम. जी. रामचंद्रन यांनी स्थापन केलेला अण्णाद्रमुक पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर उभा आहे.
ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. 15- तामिळनाडूच्या राजकारणाकडे सध्या देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. तामिळनाडू सिनेजगतात सुपरस्टार राहिलेल्या एम. जी. रामचंद्रन यांनी स्थापन केलेला अण्णाद्रमुक पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर उभा आहे. अडीच दशके जयललितांच्या नेतृत्वात यशस्वी वाटचाल केल्यानंतर अण्णा द्रमुकमध्ये ही अभूतपूर्व स्थिती उद्भवली आहे.
जयललिता यांच्या निधनानंतर हा पक्ष व्ही. के. शशिकला आणि ओ. पनीरसेल्वम यांच्यामध्ये विभागला गेला आहे. उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती जमवल्यामुळे शशिकला यांना चार वर्षे तुरुंगवास आणि दहा कोटी रुपये दंडाची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने सुनावली आहे. मात्र त्यानंतर समर्थक आमदारांची बैठक घेऊन त्यांनी ओ. पनीरसेल्वम यांना तडकाफडकी पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला आणि ई. के. पलानीस्वामी यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात त्या यशस्वी ठरल्या. मात्र अजूनही अण्णाद्रमुक पक्षावर विभाजनाचं संकट घोंघावत आहे. पलानीस्वामी यांच्यासोबत ओ. पनीरसेल्वमही विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याची शक्यता आहे.
(शशिकलांना तुरुंगवास)
(गुंतागुंत आणखी वाढली)
जयललितांनंतर शशिकला पक्षाच्या सर्वोच्च नेत्या समजल्या जात होत्या. त्यामुळे त्यांनी पनीरसेल्वम यांच्या जागी स्वतः मुख्यमंत्री बनण्याच्या प्रयत्न केल्यानं पक्षावर विभाजनाची स्थिती ओढावली आहे. पनीरसेल्वम यांनी मुख्यमंत्रिपद भूषवताना पक्षात स्वतःचं असं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. शशिकला यांच्या तुरुंगवारीमुळे पनीरसेल्वम गटात आनंदाचे वातावरण असून, आता आणखी काही आमदार आपल्याकडे येतील, असे मुख्यमंत्र्यांचे समर्थक सांगत आहेत. या आमदारांचे मन वळवण्यासाठी पनीरसेल्वम गटाचे काही नेते प्रयत्नशील आहेत. याच वेळी ब-याच काळ सत्तेपासून दूर असलेल्या डीएमकेच्याही आशा पल्लवित झाल्या आहेत. पनीरसेल्वम की पलानीसामी?, या वादाचा थेट फायदा डीएमकेला होण्याची शक्यता नाकारता येत नाही.