इतिहासाची माेडताेड खपवून घेणार नाही, सोनिया गांधींचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2022 07:10 AM2022-08-16T07:10:45+5:302022-08-16T07:11:04+5:30
Sonia Gandhi : स्वातंत्र्य दिनानिमित्त जारी करण्यात आलेल्या संदेशात सोनिया गांधी यांनी केंद्रावर अप्रत्यक्ष टीका केली आहे.
देशाने गेल्या ७५ वर्षांत देदीप्यमान कामगिरी नोंदवली आहे. मात्र, स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाची खिल्ली उडवून इतिहासाच्या माेडताेडीचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिला आहे.
स्वातंत्र्य दिनानिमित्त जारी करण्यात आलेल्या संदेशात सोनिया गांधी यांनी केंद्रावर अप्रत्यक्ष टीका केली आहे. संदर्भ होता स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला भाजपकडून जारी करण्यात आलेल्या व्हिडीओ क्लिपचा. या क्लिपमध्ये स्वातंत्र्याच्या लढ्यादरम्यान नेहरूंच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले आहे.
भाजपच्या समाज माध्यमी मंचावर ही व्हिडीओ क्लिप जारी करण्यात आली आहे. त्यावर काँग्रेसने जोरदार आक्षेप घेतला आहे. हाच संदर्भ देत सोनिया गांधींनी केंद्रावर अप्रत्यक्ष टीका केली. राजकीय फायद्यासाठी इतिहासातील वस्तुस्थितींची मोडतोड योग्य नसून हे अस्वीकारार्ह असल्याचे सोनिया यांनी जारी केलेल्या निवेदनात नमूद केले आहे.