ड्रायव्हर संपाचा मोठा फटका, अनेक शहरात इंधनाचा तुटवडा; पेट्रोल पंपावर रांगा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2024 08:15 AM2024-01-02T08:15:07+5:302024-01-02T08:18:05+5:30
हिट अँन्ड रन या कायद्याद्वारे सरकारने अपघातातील वाहनचालकांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे
नवी दिल्ली - Drivers Strike Update ( Marathi News ) केंद्र सरकारकडून हिट अँन्ड रन कायद्याच्या सुधारणेविरोधात संपूर्ण देशात ट्रक आणि डंपर चालकांनी चक्का जाम आंदोलन केले आहे. हा कायदा चुकीचा असून तो परत घेतला पाहिजे अशी मागणी करत मुंबई, इंदूरपासून दिल्ली हरियाणा, यूपीसह अनेक ठिकाणी ट्रक चालकांनी ट्रक रस्त्यावर उभे करत वाहतूक रोखली आहे. महाराष्ट्रात काही ट्रक चालकांनी आक्रमक पवित्रा घेत पोलिसांवर हल्ला केला आहे. या आंदोलनाचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटत आहेत.
काय आहे हिट अँड रन कायदा?
हिट अँड रन या कायद्याद्वारे सरकारने अपघातातील वाहनचालकांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. ज्यात जर कुठलाही ट्रक अथवा डंपर चालकाने कुणाला चिरडले तर त्याला १० वर्षाची जेल होऊ शकते. त्याशिवाय ७ लाखांचा दंडही भरावा लागू शकतो. याआधी अशा प्रकरणात आरोपी ड्रायव्हरला जामीन मिळत होता त्यामुळे तो लगेच बाहेर यायचा. त्याचसोबत या सध्या २ वर्षाची शिक्षेची तरतूद होती.
नव्या कायद्याविरोधात ट्रक चालक संतप्त
सरकारच्या या कायद्याविरोधात ट्रक चालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. हा कायदा कठोर आहे. सरकारने तो परत घ्यावा अशी मागणी ट्रक चालकांनी लावून धरली आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले जात आहे. मुंबई, महाराष्ट्रातही हे आंदोलन पेटले आहे. सरकारच्या कायद्याविरोधात ट्रक चालक एकवटले आहेत. त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.
पेट्रोल-डिझेलचा तुटवडा, पंपावर मोठी रांग
ट्रक चालकांच्या देशव्यापी आंदोलनाचा फटका सर्वसामान्य जनतेला होत आहे. ट्रक चालकांच्या संपामुळे इंधन वाहतूक थांबली आहे. त्यामुळे अनेक पेट्रोल पंपावर इंधनाचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यातच काही पेट्रोल पंपावर इंधनच नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. पेट्रोल डिझेल मिळत नसल्याने जिथे मिळेल तिथे वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्या आहेत.गेल्या ३ दिवसांपासून इंडियन ऑयलच्या इंधनाचा पुरवठा करणाऱ्या वाहनांवर परिणाम झाला आहे. हिमाचल प्रदेशात पेट्रोल डिझेलचे संकट उभे राहिल्याने पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात इंधन पुरवठा सुरू करण्यात आला आहे.