आता गाईंसाठीही हायटेक मसाज पार्लर
By Admin | Published: May 1, 2017 01:31 PM2017-05-01T13:31:46+5:302017-05-01T16:05:05+5:30
लाला लजपतराय पशू चिकित्सा व पशू विज्ञान विश्वविद्यालयाने देशी गायींच्या प्रजातींमध्ये सुधारणा आणण्यासाठी व दुधाचे उत्पादन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून संशोधन सुरू केले आहे.
ऑनलाइन लोकमत
हिसार(हरियाणा), दि. 1 - लाला लजपतराय पशू चिकित्सा व पशू विज्ञान विश्वविद्यालयाने देशी गायींच्या प्रजातींमध्ये सुधारणा आणण्यासाठी व दुधाचे उत्पादन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून संशोधन सुरू केले आहे.
एवढंच नाही तर हरियाणातील पहिले हायटेक गाय फार्म प्रकल्पावरही काम सुरू करण्यात आले आहे. येथे गाईंना आंघोळ घालण्यापासून ते त्यांना मसाज करण्यापर्यंत व स्वच्छता राखण्याच्या दृष्टीने यंत्रांच्या सहाय्याने सर्व देखभाल करण्यात येणार आहे. एकप्रकारे गाईंसाठी हे हायटेक मसाज पार्लर असल्याचे बोलले जात आहे. या संपूर्ण प्रणालीला "ऑटोमॅटिक पार्लर" असे नाव देण्यात येणार आहे.
यंत्रांद्वारेच येथे पशूंचे दुध काढण्यात येणारे व गरजेनुसार त्यांना चाराही घालण्यात येईल. हे सर्व कार्य कम्प्युटरच्या सहाय्याने करण्यात येणार आहेत.
लाला लजपतराय पशू चिकित्सा व पशू विज्ञान विश्वविद्यालयचे एनिमल जेनेटिक्स अँड ब्रीडिंग डिपार्टमेंटचे प्रमुख डॉ. ए.एस यादव यांनी सांगितले की, या हायटेक गाय फार्मसाठी राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत 3 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे.
हे फार्म दोन एकर क्षेत्रावर साकारण्यात येणार आहे. यासाठी टेंडरही जारी करण्यात आले आहे आणि आतापर्यंत तीन परदेशी कंपन्यांनी गुंतवणुकीसाठी पसंतीही दर्शवली आहे. हे फार्म सध्या युनिर्व्हसिटीतील जुन्या कॅम्पसमध्ये उभारण्यात येईल.
नवीन कॅम्पस बनवल्यानंतर हे फार्म दुसरीकडे हलवण्यात येण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे केवळ एक कर्मचारी कम्प्युटरच्या सहाय्याने संपूर्ण फार्मची जबाबदारी सांभाळू शकतो. याबाबत अधिक माहिती देताना डॉ. यादव यांनी सांगितले की, दुध काढणारे यंत्र गाईचे वजन, दुधाचे प्रमाण यानुसार स्वतःहून गाईंना चरण्यासाठी चारा देणार. या प्रकल्पामुळे कृषि क्षेत्रात नक्कीच क्रांती घडण्याची शक्यता आहे.