दहशतवाद्यांचं सुरक्षा दलांना खुलं आव्हान; श्रीनगरच्या लालचौकात काढला सेल्फी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2018 10:51 PM2018-11-22T22:51:24+5:302018-11-22T23:00:07+5:30
हिज्बुलच्या कमांडरचा श्रीनगरच्या लालचौकात सेल्फी
श्रीनगर: जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांना थेट आव्हान दिलं आहे. हिज्बुल मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांनी थेट श्रीनगरच्या मध्यभागात असलेल्या लालचौक परिसरात बैठक घेतली आहे. या बैठकीला जवळपास १० दहशतवादी उपस्थित होते, असं वृत्त 'टाईम्स नाऊ'नं दिलं आहे. या बैठकीनंतर हिज्बुलचा कमांडर उमर माजिद उर्फ हनजल्लानं या भागातील सेल्फीदेखील सोशल मीडियावर पोस्ट केला. त्यामुळे जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा व्यवस्थेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
काश्मीरच्या प्रसिद्ध लालचौक परिसरात उमर माजिदनं काढलेला सेल्फी सध्या व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे हिज्बुलनं या बैठकीआधी सुरक्षा दलांना थेट आव्हान दिलं होतं. '२१ तारखेला आम्ही श्रीनगरमध्ये बैठक घेऊ. सुरक्षा दलांनी त्यांना हवं ते करावं,' असा स्पष्ट इशारा हिज्बुल मुजाहिद्दीननं दिला होता. त्यानंतर आता उमरचा लालचौकातील सेल्फी सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या सेल्फीत श्रीनगरमधलं प्रसिद्ध घंटाघर दिसत आहेत.
हिज्बुल मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांची श्रीनगरमध्ये बैठक झाली. उमर माजिद या बैठकीचा मास्टरमाईंड होता. बैठकीनंतर त्यानं घंटाघराजवळ एक सेल्फी काढला. त्यानंतर त्यानं तो सेल्फी सोशल मीडियावर पोस्ट केला. मात्र याबद्दल पोलिसांनी अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. या प्रकरणाचा तपास सुरू असून त्यानंतर त्याची माहिती दिली जाईल, असं पोलिसांनी सांगितलं आहे. मात्र या प्रकारामुळे सुरक्षा व्यवस्थेतील ढिसाळपणा समोर आला आहे.