काश्मीरमध्ये भारतीय सैन्याने जिवंत पकडला हिजबुल मुजाहिदीनचा दहशतवादी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2017 01:28 PM2017-09-10T13:28:05+5:302017-09-10T13:28:11+5:30
जम्मू-काश्मीरमधील शोपियान सेक्टरमध्ये एका दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात भारतीय सैन्याला यश आलं आहे. रात्रभर सुरू असलेल्या चकमकीत भारतीय जवानांनी एक दहशतवाद्याला ठार केले तर एकाला शस्त्रासह अटक केली आहे.
श्रीनगर, दि. 10 - जम्मू-काश्मीरमधील शोपियान सेक्टरमध्ये एका दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात भारतीय सैन्याला यश आलं आहे. रात्रभर सुरू असलेल्या चकमकीत भारतीय जवानांनी एक दहशतवाद्याला ठार केले तर एकाला शस्त्रासह अटक केली आहे. या ठिकाणी दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर शुक्रवारी रात्रीपासून सुरक्षा दलांनी या परिसरात शोध मोहीम हाती घेतली होती. त्यानंतर परिसराला सुरक्षा दलाच्या जवानांनी घेरल्यानंतर एका घरातून अचानक गोळीबार सुरू झाला. प्रत्युत्तरात जवानांनी गोळीबार केला.
यावेळी चकमकीत हिजबुल मुजाहिदीनचा एक दहशतवादी ठार मारला गेला. तर दुस-या एका दहशतवाद्याने आत्मसमर्पण करण्याची इच्छा व्यक्त केली. त्याने शरणागती पत्करल्यास ठार करणार नसल्याचे सांगितले. त्यानंतर दहशतवाद्याने पोलिसांसमोर शरणागती पत्करली. अदिल असं शरणागती पत्कारलेल्या दहशतवाद्याचं नाव असल्याची माहिती आहे. चकमकीत ठार मारला गेलेला दहशतवाद्याची ओळख पटली असून त्याचे नाव तारिक अहमद दार आहे.
शरण आल्यास तुला मारणार नाही, अशी शाश्वती पोलिसांनी दिल्यानंतर घराच्या ढिगाऱ्याआड लपलेला आदिल बाहेर आला. त्यानंतर त्याने आपली एके-४७ रायफल जमिनीवर ठेवली आणि सुरक्षा दलांच्या स्वाधीन झाला. काश्मीर खोऱ्यातील अनेक दहशतवादी कारवायांमध्ये आदिलचा सहभाग होता. आदिल शोपियान जिल्ह्यातील चिटीपोरामध्ये राहणारा आहे. अटक करण्यात त्याची चौकशी सुरू करण्यात आली आहे.