"मोठ्या शहरात छेडछाड होणं सामान्य आहे"; कर्नाटकच्या गृहमंत्र्यांचे वादग्रस्त विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 12:44 IST2025-04-07T12:44:22+5:302025-04-07T12:44:41+5:30
कर्नाटकमध्ये महिलेच्या छेडछाडीच्या घटनेवर गृहमंत्री जी परमेश्वरा यांनी वादग्रस्त विधान केले.

"मोठ्या शहरात छेडछाड होणं सामान्य आहे"; कर्नाटकच्या गृहमंत्र्यांचे वादग्रस्त विधान
Karnatak Crime: एखाद्या गंभीर स्वरुपाच्या घटनेवर वादग्रस्त वक्तव्ये केल्याशिवाय काही नेत्यांना राहवत नाही. देशातल्या कोणत्याही भागातील नेते संवेदना सोडून वादग्रस्त वक्तव्ये करताना मागे पुढे पाहत नाहीत. अशातच कर्नाटकच्या गृहमंत्र्यांनी एका महिलेच्या छेडछाडीवर अंसेवदनशील असं विधान केले आहे. कर्नाटकचे गृहमंत्री जी परमेश्वरा यांनी सोमवारी एक वादग्रस्त टिप्पणी केली. रस्त्यावर महिलांच्या विनयभंगाच्या घटना बंगळुरूसारख्या मोठ्या शहरात घडणं सामान्य असल्याचे विधान गृहमंत्री जी परमेश्वरा यांनी केले. यावर विनयभंग करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे सांगून त्यांनी पोलिसांना गस्त वाढवण्याचे निर्देश दिले आहेत.
गेल्या आठवड्यात, सुद्दागुंटेपल्या येथील भारती लेआउट येथील सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले होते ज्यामध्ये रस्त्यावर एक व्यक्ती एका महिलेला हात लावत पळून जात होता. ३ एप्रिल रोजी पहाटे ही घटना घडली. एक व्यक्ती छोट्या गल्लीतून चालणाऱ्या दोन महिलांकडे आला आणि त्याने एका महिलेला भिंतीवर ढकलले. त्यानंतर दुसऱ्या महिलेला त्याव्यक्तीने चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला आणि तिथून काढला.
हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. व्हिडीओ समोर येताच सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली होती. आरोपीवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येऊ लागली आहे. या घटनेमुळे संताप व्यक्त झाल्यानंतर बंगळुरू पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल केला आहे.
अशातच गृहमंत्री जी परमेश्वरा यांनी या घटनेवर धक्कादायक असं विधान केले आहे. "मोठ्या शहरात अशा घटना सतत घडत असतात. अशा घटना घडणे सामान्य आहे. जी काही कायदेशीर कारवाई करावी लागेल, ती कायद्यानुसारच केली जाईल. मी माझ्या आयुक्तांना गस्त वाढवण्याच्या सूचनाही दिल्या आहेत," असे गृहमंत्री जी परमेश्वरा म्हणाले.
छेडछाडीच्या घटनांवर गृहमंत्र्यांनी दाखवले होते पाश्चात्य कपड्यांकडे बोट
दरम्यान, काही वर्षांपूर्वी बंगळुरूमध्ये नववर्षाच्या उत्सवादरम्यान मुलींच्या छेडछाडीच्या घटनांबाबत कर्नाटकचे गृहमंत्री जी परमेश्वरा यांनी धक्कादायक विधान केले होते. नाताळ आणि नवीन वर्षाच्या उत्सवात अशा घटना घडतात असे परमेश्वरा म्हणाले होते.
"पाश्चिमात्य पद्धतीच्या अशा कार्यक्रमांना तरुणाई मोठ्या प्रमाणात जमते. ते केवळ मानसिकतेत पाश्चात्य शैलीची कॉपी करत नाहीत तर ते कपडे देखील घालतात. अशा कार्यक्रमांचे आयोजन आणि नियंत्रण कसे केले जाते हे पाहण्याची गरज आहे. आम्ही १०,००० पोलिस तैनात करू शकत नाही. मात्र, विनयभंगाच्या घटना ही चांगली बाब नसून पुन्हा अशा घटना घडू नयेत, हे बघू," असं स्पष्टीकरण गृहमंत्री जी परमेश्वरा यांनी दिले होते.