पालक देशाबाहेर गेलेच नाही, मग 8 महिन्यांच्या चिमुकलीला HMPV ची लागण कशी झाली?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 14:53 IST2025-01-06T14:52:30+5:302025-01-06T14:53:02+5:30
HMPV बाबत तज्ञ काय सांगतात, जाणून घ्या...

पालक देशाबाहेर गेलेच नाही, मग 8 महिन्यांच्या चिमुकलीला HMPV ची लागण कशी झाली?
HMPV Cases in India: कोरोनानंतर आता चीनमधूनच एक नवीन व्हायरस जगभर पसरतोय. ह्युमन मेटान्यूमोव्हायरस (HMPV), असे याचे नाव असून, भारतातदेखील याचे रुग्ण आढळले आहेत. कर्नाटकात तीन आणि आठ महिन्यांच्या दोन मुलींमध्ये HMPV चा संसर्ग आढळून आला आहे. चीनमध्ये वेगाने पसरणारा विषाणू भारतात आढळल्यामुळे लोक चिंतेत आहेत. महत्वाची बाब म्हणजे, लागण झालेली दोन्ही चिमुकले किंवा त्यांचे पालक भारताबाहेर गेलेच नाहीत, मग त्यांना विषाणूची लागण कशी झाली? हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, डॉ. अमर फेटल सांगतात की, सामान्य सर्दीप्रमाणेच HMPV विषाणू देशात पसरतोय. यामुळे सामान्य श्वासोच्छवासाचा संसर्ग होतो. हा विषाणू इतर देशातून भारतात आणण्याची गरज नाही. कारण, हा हिवाळ्यातील इतर विषाणूंप्रमाणेच सतत विकसित होत राहतो. आता हा विषाणू शोधला जातोय, कारण याचे चाचणी किट मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत.
कोरोनाप्रमाणे HMPV ला घाबरण्याची गरज नाही. सामान्य काळजी घेतल्यावर विषाणूची लागण टाळता येते. विषाणू लागण टाळण्यासाठी बाहेर जाताना तोंड आणि नाक झाकून घ्या, शिंकाल तेव्हा तुमचे तोंड टॉवेल किंवा टिश्यू पेपरने झाका, जेणेकरुन इतरांना लागण होणार नाही. असे केल्याने तुम्ही व्हायरसपासून दूर राहू शकता. मुलांची तब्येत ठीक नसेल, तर त्यांना घरात विश्रांती घेऊ द्या, त्यांना भरपूर पाणी द्या आणि चांगले पौष्टीक अन्न खाऊ घाला. व्हायरसमुळे घाबरून जाण्याची गरज नाही, परंतु दक्षता घेणे आवश्यक आहे, अशी माहितीदेखील डॉ. अमर यांनी दिली. खोट्या बातम्या पसरवून लोकांनी घाबरू नये, भीतीचे वातावरण निर्माण करू नये, असा सल्लाही त्यांनी दिला.