एचएमटी घड्याळाचे ‘टिकटिक’ थांबणार
By Admin | Published: September 12, 2014 02:52 AM2014-09-12T02:52:20+5:302014-09-12T02:52:20+5:30
कोट्यवधी भारतीयांच्या गेल्या दोन पिढ्यांनी देशी स्वाभिमानाचे प्रतीक म्हणून अभिमानाने मनगटावर बांधलेली एचएमटी घड्याळे आता इतिहासजमा होणार
नवी दिल्ली : कोट्यवधी भारतीयांच्या गेल्या दोन पिढ्यांनी देशी स्वाभिमानाचे प्रतीक म्हणून अभिमानाने मनगटावर बांधलेली एचएमटी घड्याळे आता इतिहासजमा होणार आहेत. या घड्याळांचे उत्पादन करणाऱ्या ‘एचएमटी वॉचेस’ या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीचा गाशा गुंडाळण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्याचे वृत्त आहे.
हिंदुस्थान मशिन टूल्स (एचएमटी) या सार्वजनिक क्षेत्रातील मुख्य कंपनीची एचएमटी वॉचेस ही एक उपकंपनी असून १९६१ मध्ये जपानच्या सिटिझन वॉच कंपनीच्या सहकार्याने तिची स्थापना केली गेली होती. त्या काळात लोकांना तस्करीच्या मार्गाने देशात येणाऱ्या विदेशी मनगटी घड्याळांची ‘क्रेझ’ होती. ‘एचएमटी’ने वाजवी किमतीच्या दर्जेदार घड्याळांची निर्मिती करून घड्याळांची तस्करी जवळजवळ बंद पाडली. परंतु इतर खासगी देशी कंपन्यांच्या स्पर्धेत टिकून राहणे एचएमटीला जनेमासे झाले व गेली सलग १४ वर्षे ही कंपनी सतत तोट्यात चालत होती. कंपनीला २०१२-१३ मध्ये २४२ तर २०११-१२ मध्ये २२४ कोटी रुपये तोटा झाला होता. २००० मध्ये एचएमटी वॉच बिझनेस ग्रुपची एचएमटी वॉचेस लिमिटेड अशी फेरबांधणी करण्यात आली होती. तथापि, या फेररचनेनंतरही तोटा काही कमी झाला नाही.