Holi 2022: “होळीचे नियम, निर्बंध राज्य अन् जनतेच्या हितासाठी”; संजय राऊतांनी केली पाठराखण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2022 11:47 AM2022-03-17T11:47:38+5:302022-03-17T11:48:35+5:30

Holi 2022: संजय राऊत यांनी ठाकरे सरकारच्या गाइडलाइन्सचे समर्थन करत भाजपवर टीका केली आहे.

holi 2022 shiv sena sanjay raut backed thackeray govt guidelines for holi festival and dhulivandan | Holi 2022: “होळीचे नियम, निर्बंध राज्य अन् जनतेच्या हितासाठी”; संजय राऊतांनी केली पाठराखण

Holi 2022: “होळीचे नियम, निर्बंध राज्य अन् जनतेच्या हितासाठी”; संजय राऊतांनी केली पाठराखण

Next

नवी दिल्ली: मराठी महिन्यातील शेवटचा पण तितकाच महत्त्वाचा मोठा सण म्हणजे होळी. देशभरात होळी उत्साहात साजरी करण्यात येते. महाराष्ट्रातही होळीचा रंग न्याराच असतो. मात्र, होळी आणि धुलिवंदन साजरे करण्यासंदर्भात राज्य सरकारने नवीन गाइडलाइन्स जारी केल्या आहेत. यावरून आता विरोधी पक्ष भाजपने ठाकरे सरकारवर टीका केली आहे. मात्र, शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ठाकरे सरकारच्या निर्णयाची पाठराखण करत होळीचे नियम आणि निर्बंध राज्याच्या तसेच जनतेच्या हितासाठी असल्याचे म्हटले आहे. 

रात्री १० च्या आत होळी पेटवण्याचे बंधन राज्य सरकारने घातले आहे. तसेच दहावी आणि बारावीच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये, यासाठी डीजेबरोबरच मोठ्या आवाजात ध्वनिक्षेपक लावण्यासही बंदी घालण्यात आली आहे. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाईची तरतूद गृहविभागाने मार्गदर्शक नियमावलीत केली आहे. राज्यातील सर्व पोलीस स्टेशनना ही नियमावली पाठवण्यात आली असून, या नियमावलीचे काटेकोर पालन करण्याचा आदेश देण्यात आला आहे. यासंदर्भात संजय राऊत यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. 

संपूर्ण देशात कोरोनाची भीती कमी झालेली नाही

महाराष्ट्रातील विरोधी पक्ष ज्या पद्धतीने वागत आहे, त्यांनी त्यांचे नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून काही सूचना घ्यायला हव्यात. संपूर्ण देशात कोरोनाची भीती कमी झालेली नाही. चीनमध्ये पुन्हा एकदा काही ठिकाणी लॉकडाऊन लागत आहे. केंद्र सरकारनेदेखील काही निर्बंधांचे पालन करा असे सूचवले आहे. महाराष्ट्र सरकारने त्यासंदर्भात काही नियम, निर्बंध ठेवले असतील तर राज्याच्या आणि लोकांच्या हितासाठी आहेत, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. 

हेही वाचा: होळी, धुलिवंदनासाठी राज्य सरकारची नवी नियमावली जारी

अमानुष राजकारण महाराष्ट्रात यापूर्वी कोणी केले नव्हते

विरोधी पक्षाने विरोध करु नये. विरोधासाठी विरोध करत लोकांचे जीव धोक्यात घालण्याच्या मानसिकतेतून बाहेर पडण्यास ते तयार नाहीत. सत्ता येत नसल्याने वैफल्य येऊ शकतं, पण ते अशा टोकाला जाऊ नये की आपल्या राज्यात आपल्याच लोकांचे बळी जावेत आणि त्याचेही राजकारण करत सरकारला धारेवर धरता यावे हे चुकीचे आहे. इतके क्रूर पद्धतीचे, अमानुष राजकारण महाराष्ट्रात यापूर्वी कोणी केले नव्हते आणि करु नये, या शब्दांत संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. 

दरम्यान, भाजप नेते आणि आमदार राम कदम यांनी ठाकरे सरकारच्या गाइडलाइन्सवर टीका केली असून, महाराष्ट्र सरकारचा एवढा टोकाचा हिंदू सणांना विरोध का? आता पुन्हा त्यांनी होळी आणि रंगपंचमी साजरी करण्यावर निर्बंध घातलेत.. आहो तुम्ही घाबरत असाल.. हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे. आम्हाला कळते स्वतःची कशी काळजी घ्यायची. तुमचे निर्बंध गेले खड्ड्यात. तुमच्याच भाषेत काय उखाडायचे ते उखाडा. आम्ही आमचा हिंदू सण जल्लोषात साजरा करणारच, असे ट्विट राम कदम यांनी केले आहे. 
 

Web Title: holi 2022 shiv sena sanjay raut backed thackeray govt guidelines for holi festival and dhulivandan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.