हैदराबादमध्ये होळी साजरी करण्यावर कडक निर्बंध, "तुम्ही CM की निजाम?’’, संतप्त भाजपाचा मुख्यमंत्र्यांना सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 20:33 IST2025-03-13T20:32:03+5:302025-03-13T20:33:01+5:30
Hyderabad Holi News: देशभरात होळीचा सण उत्साहात साजरा होत आहे. मात्र काही ठिकाणी या सणाला गालबोट लागण्याच्या घटनाही घडत आहेत. तर काही ठिकाणी होळीसाठीच्या नियमांवरून वाद होत आहेत. आता तेलंगाणा सरकारने हैदराबाद आणि सायबराबादमध्ये होळी साजरी करण्यासाठी घातलेल्या निर्बंधांमुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

हैदराबादमध्ये होळी साजरी करण्यावर कडक निर्बंध, "तुम्ही CM की निजाम?’’, संतप्त भाजपाचा मुख्यमंत्र्यांना सवाल
देशभरात होळीचा सण उत्साहात साजरा होत आहे. मात्र काही ठिकाणी या सणाला गालबोट लागण्याच्या घटनाही घडत आहेत. तर काही ठिकाणी होळीसाठीच्या नियमांवरून वाद होत आहेत. आता तेलंगाणा सरकारने हैदराबाद आणि सायबराबादमध्ये होळी साजरी करण्यासाठी घातलेल्या निर्बंधांमुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. तेलंगाणा सरकारने हैदराबाद आणि सायबराबादमध्ये होळी साजरी करताना जबरदस्तीने रंग लावण्यावर आणि गटागटाने वाहनं चालवण्यावर बंदी घातली आहे. शहरात शांतता कायम राहावी यासाठी हे निर्बंध आवश्यक असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मात्र भाजपाने याविरोधात संतप्त प्रतिक्रिया दिली असून, भाजपा आमदार राजा सिंह यांनी सरकारचे हे आदेश म्हणजे तुघलकी फर्मान असल्याचे सांगितले आहे. तसेच तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेंवंत रेड्डी हे नववे निजाम असल्याची टीका त्यांनी केली.
होळीसाठी हैदराबाद पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या आदेशानुसार १३ मार्च रोजी संध्याकाळी ६ वाजल्यापासून १५ मार्च रोजी संध्याकाळी ६ वारेजपर्यंत रस्त्यांवरून गटागटांनी वाहनं चालवता येणार नाहीत. तसेच कुणावरही जबरदस्तीने रंग टाकण्यास किंवा रंगीत पाणी फेकण्यास मनाई असेल. त्याशिवाय १४ मार्च रोजी सकाळी सहा वाजल्यापासून संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मद्य आणि ताडीची दुकानं बंद राहतील. मात्र फाईव्ह स्टार हॉटेल आणि क्लबवर बंदी नसेल.
दरम्यान, भाजप आमदार टी. राजा सिंह यांनी मात्र या बंदीविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. ते म्हणाले की, हा आदेश हिंदूंना लक्ष्य करण्यासाठी देण्यात आला आहे. रमजानच्या ३० दिवसांमध्ये जेव्हा लोक रात्रभर रस्त्यांवर दुकाची आणि गाड्या घेऊन फिरतात तेव्हा पोलिसांना त्रास होत नाही? मात्र होळीसाठी अचानक निर्बंध लादण्यात आले आहेत, असा आरोप केला.
काँग्रेस पक्ष हा एका खास समाजाचा गुलाम झाला आहे. तसेच हिंदूंविरोधात निर्णय घेत आहे. निजामाच्या काळात हिंदूंवर अत्याचार व्हायचे. आता रेवंत रेड्डी तेच करत आहेत, असा आरोपही राजा सिंह यांनी केला.