देशभरात होळी उत्साहात
By admin | Published: March 14, 2017 12:29 AM2017-03-14T00:29:23+5:302017-03-14T00:29:23+5:30
बंधूप्रेमाचा आणि रंगाचा उत्सव असलेले होळीपर्व देशभरात हर्षोल्हासात साजरा करण्यात आले. देशाच्या विविध प्रांतात नागरिकांनी पारंपरिक पद्धतीने एकमेकांना शुभेच्छा दिल्या
नवी दिल्ली : बंधूप्रेमाचा आणि रंगाचा उत्सव असलेले होळीपर्व देशभरात हर्षोल्हासात साजरा करण्यात आले. देशाच्या विविध प्रांतात नागरिकांनी पारंपरिक पद्धतीने एकमेकांना शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मंत्री आणि राजकीय व्यक्तींनी जनतेला होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
सोमवारी संपूर्ण देश होळीच्या रंगात रंगलेला दिसून आला. भारतीयांचा हा रंगोत्सव अनुभवण्यासाठी अनेक विदेशी पाहुण्यांनीही यावेळी हजेरी लावली होती. उत्तर भारतात विशेषत: राजस्थान, वाराणसी, याठिकाणी पाहुण्यांनी रंगबहार अनुभवला.
जयपूर बनले
आणखी गुलाबी
राजस्थानमध्ये पूर्ण हर्षोल्हासात होळी साजरी करण्यात आली. गुलाबी शहर जयपूरमध्ये नागरिक एकमेकांच्या चेहऱ्यावर गुलाल आणि रंग लावून होळीच्या शुभेच्छा देताना दिसत होते. गाण्यांच्या तालावर तरुणाई एकमेकांना रंगाने न्हाऊ घालत होती. लहान मुले पिचकारीने एकमेकांवर रंग उडवताना दिसत होते.
निमलष्करी दलाने केली नाही होळी
नवी दिल्ली : छत्तीसगढमधील सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे १२ पोलिस शहीद झाले. त्यांना श्रद्धांजली म्हणून राखीव दलाच्या पोलिसांनी होळीचा सण साजरा केला नाही. केंद्रीय राखीव दल आणि राज्य राखीव दलाने कोठेही होळी साजरी करू नये, असा आदेश दिला आहे. तसेच सीआयएसएफ, बीएसएफ, आयटीबीपी आणि एसएसबी दलानेही होळी साजरी न करण्याचा निर्णय घेतला आहे. सीआरपीएफच्या महानिदेशकांनी पोलिसांनी घेतलेल्या या निर्णयाबाबत आणि शहिदांच्या कुटुंबासाठी दाखविलेल्या एकजुटीबद्दल आभार मानले.
पंजाब, हरियाणात ‘गुजिया’च्या गोडव्यात रंगोत्सव
चंदीगड : पंजाब, हरियाणा आणि चंदीगडमध्ये मोठ्या उत्साहात होळीचा सण साजरा करण्यात आला. नागरिकांनी एकमेकाला अबीर-गुलाल आणि रंग लावून शुभेच्छा दिल्या, तसेच आपल्या आप्त, मित्रांना परंपरागत मिठाई ‘‘गुजिया’’ भेट देऊन होळीचा आनंद द्विगुणीत केला. तरुण, तरुणींचे जत्थे मोटारसायकलवरून रंगाची उधळण करीत फिरत होते. एकीकडे सगळा आनंदी माहोल असताना जाट समितीने काळी होळी पाळली. जाटांना नोकरी आणि शिक्षणात आरक्षण मिळावे यासाठी काळी होळी पाळण्याचे आवाहन अखिल भारतीय जाट आरक्षण संघर्ष समितीने केले होते.
पंतप्रधान मोदी यांच्याकडून शुभेच्छा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी जनतेला होळीच्या शुभेच्छा दिल्या. पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटले आहे की, ‘‘रंगाचा उत्सव असलेल्या होळी सणाच्या हार्दिक शुभेच्छा! या सणाच्या निमित्ताने सर्वत्र आनंद आणि उल्हास नांदू दे.’’ गृहमंत्री राजनाथसिंग आणि नागरी विकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनीही जनतेला होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.