#Holi2018 : कुठे रंगात बुडून तर कुठे भांगेत झिंगून साजरी केली जाते होळी, एका देशातल्या नाना तऱ्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2018 09:21 PM2018-02-28T21:21:07+5:302018-03-01T11:49:29+5:30
हा देश जितका मोठा, इथली विभिन्नता तितकीच निराळी. कुठे नवऱ्याला काठीने मारुन तर कुठे विधवा बेभान होऊन साजरी करतात होळी.
मुंबई : ‘कब है होली,’ असं विचारायचे दिवस आता उरलेले नाहीत. कारण होळी आणि रंगपंचमी आता उद्यावर येऊन ठेपलेत. इतक्यात सर्वांनी आपापले जुने कपडे शोधूनसुद्धा ठेवले असतील. देशभरात हा सण रंगांचा उत्सव म्हणून साजरा केला जातो. होळीच्या दिवशी लोक जुनी लाकडं जाळून अर्थात होलिकादहन करून प्रतीकात्मक रूपात वाईट गोष्टी आणि प्रथा जाळून टाकतात. तसंच होळीच्या दुसऱ्या दिवशी अर्थात धुळवडीच्या दिवशी एकमेकांना रंग लावून किंवा पाण्यात भिजवून हा उत्सव साजरा केला जातो. असं म्हणतात, की होळीच्या दिवसानंतर वातावरणातल्या तापमानात वाढ होते. खरं पाहता देशभरात होळी आणि धुळवडीचा उत्साह तितकाच असला तरी तो साजरा करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. कुठे ती रंगात आकंठ बुडून साजरी केली जाते तर कुठे भांगेत झिंगून. हा पूर्ण दिवस रंगीबेरंगी पाण्याने भरलेले फुगे आणि रंग उडवून साजरा केला जातो. ‘बुरा ना मानो होली है’, असं म्हणत लोक वाट्टेल ते करतात. यादिवशी आपल्या शाळेतल्या शिक्षकांनी शिकवल्याप्रमाणे कोणीही उच्च-नीचतेचा भेदभाव मानत नाही, गरीब-श्रीमंत पाहत नाही. जो समोर येईल त्याला रंगांनी रंगवलं जातं. सगळीकडे तीच मजा असली तरीही त्यातही थोडा फरक जाणवतोच. पाहू या संपूर्ण भारतात होळी आणि धुळवडीचे हे २ दिवस कसे साजरे केले जातात.
१) उत्तर प्रदेश
उत्तर प्रदेश येथील स्त्रियांसाठी हा दिवस फार महत्त्वाचा आणि खास असतो. यादिवशी त्या आपल्या पतीला लाकडी दंडुक्याने मारतात आणि पती आपला बचाव करत असतो. ही तिथली फार जुनी आणि महत्त्वाची प्रथा आहे. तुम्हाला आठवत असेल तर नुकत्याच आलेल्या 'टॉयलेट : एक प्रेमकथा' या चित्रपटात अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकरवर हे दृष्य चित्रीत करण्यात आलं आहे. याला 'लठामार होळी' असं म्हटलं जातं. यादिवशी मंदिरांत दिव्यांशी आरास केली जाते.
तसंच तेथील मथुरा येथे मोठ्या प्रमाणावर होळी खेळली जाते. रस्तेच्या रस्ते आणि माणसंच्या माणसं रंगांत माखलेली दिसतात. या फोटोंवरून तुम्हाला त्याची कल्पना येईलच.
तसंच वृंदावन येथील विधवासुद्धा सर्व वाईट प्रथा-परंपरा विसरून बेभान होऊन हा सण साजरा करतात, रंगात न्हाऊन निघतात.
तसंच अलाहाबाद हे तर बिग बी अमिताभ बच्चन यांचं जन्मस्थान. तिथे तर ‘रंग बरसे, भिगे चुनरवाली रंग बरसे’ या गाण्यांशिवाय कुठेच रंगांचा हा सण पूर्णत्वास जात नाही.
२) उदयपूर, राजस्थान
राजस्थानात पारंपरिक पद्धतीने तिथली राजघराणीसुद्धा हा होलिकादहनाचा विधी पार पाडतात. आपली संस्कृती आणि परंपरा जपण्याचं काम राजस्थानी लोक कायम करत असतात. तिथे अशी लाकडं किंवा टाकाऊ वस्तू आणि कचरा उभा करून त्याची होळी पेटवली जाते. त्या ठिकाणी होत असलेला हा शाही थाट पाहण्यासाठी एकदा नक्की जाऊन या.
जयपुरातसुद्धा हा सण खऱ्या अर्थाने रंगीबेरंगी स्वरूपात साजरा केला जातो. तिथे होळीदरम्यान जयपूर हत्ती फेस्टिव्हल आयोजित केला जातो. त्यामुळे फक्त माणसंच नव्हे, तर तिथले प्राणी आणि परिसरसुद्धा रंगीबेरंगी दिसतात.
३) नाशिक
एखाद्या कृत्रिम तलावात, स्विमिंगपूलमध्ये किंवा वॉटर टबमध्ये भरपूर पाणी सोडून त्यात रंग मिसळून तो रंगीत केला जातो. त्यात सरळ-सरळ उड्या घेऊन नाशिकमध्ये धुळवड साजरी केली जाते. जो येईल त्याला सरळ त्या टबमध्ये फेकून नखशिखान्त भिजवून होळी साजरी केली जाते.
४) दिल्ली
शेवटी दिल्ली ती दिल्लीच आहे. तिथल्या गोष्टी बाकी शहरांसारख्या थोडी ना सामान्य असतील. पण तिथल्या होळीत भरपूर रंग, आनंद आणि भांग यांची सांगड पाहायला मिळते. याचा प्रत्यय तुम्हाला बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांतून आला असेल. तसंच तिथे होळी फक्त गुलालाने, रंगांनी, फुग्यांनी किंवा पिचकाऱ्यांनी साजरी केली जात नाही. तिथल्या होळीत ग्रीस ऑईल, अंडी, चिखल तसंच इतर चिकट अशा गोष्टींचा समावेश असतो.
५) दक्षिण भारत
कोण म्हणतं दक्षिण भारतात होळी आणि रंगपंचमी साजरी केली जात नाही? हा एक खरंय की तिथे आपल्यासारखी सुट्टी नसते. पण जे सण मुंबईसह महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये जोरदार साजरे केले जातात ते तिथे होऊ नये, हे थोडं नवलच. अनेक राज्यातली अनेक लोक तिथे शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी असल्याने किंवा ती लोक महाराष्ट्र आणि दिल्लीत राहून गेल्याने त्यांनासुद्धा या दिवसाची क्रेझ असते. तेसुद्धा हळूहळू आता हा दिवस साजरा करायला लागले आहेत. हो पण आपल्याकडे असलेला जोरदार उत्साह तिथे नक्कीच दिसत नाही.
रंग, गुलाल, फुगे या गोष्टी सामान्य असल्या तरी एक गोष्ट हैदराबाद येथे वेगळी असते ती म्हणजे ‘भांग’. येथील होळीला भांगेनं सुरुवात केली जाते आणि ती भांगेनं संपवलीसुद्धा जाते, सोबतच हैदराबादी ‘दम’ बिर्यानीचाही बेत असतो.
काहीशा अभ्यासू आणि खेळात कमी रमणाऱ्या बंगळुरूमध्ये होळीचा उत्साह कमी असला तरीही तिथल्या आयटी एक्सपर्टसना माहित्येय की आपल्या आयुष्यात कसे रंग भरावेत आणि होळीचा हा रंगीत दिवस कसा साजरा करावा.
६) कोलकाता
कोलकात्यासारख्या शहराला तर आनंद साजरा करण्याचं फक्त कारणच हवं असतं. तिथेसुद्धा रंगांनीच होळी आणि धुळवड साजरी केली जाते.
दुर्गापूजा वगळता यादिवशीसुद्धा ते शहर रंग आणि गुलालात न्हाऊन निघतं. होळीसह सुरू होणाऱ्या वसंत ऋतूचं स्वागत तिथं केलं जातं. अनेक ‘बसंत उत्सव’ तेथे साजरे केले जातात.
७) पंजाब
पंजाब म्हटलं तर उत्साहीपणा आलाच आणि सोबतच प्रचंड ऊर्जा आणि शारीरिक बळ. या दिवसांत तेथे अनेक पंजाबी खेळ खेळले जातात, जे कदाचित तेवढ्याच ताकदीने फक्त शीखच तुम्हाला करून दाखवू शकतात. मग त्यात तलवारबाजी, भांगडा नृत्य यांचाही समावेश असतो.
८) गोवा
गोव्यात होळी अर्थात शिमगा किंवा शिमगोत्सव साजरा केला जातो. खोटी-खोटी मुखवटे धारण करून किंवा वेशभूषा करून तेथे हा सण साजरा केला जातो. या पद्धतीला तेथे ‘सोंग’ करणं असं म्हणतात. कोकणातही हीच प्रथा किंवा हीच पद्धत असते. रंगांची उधळण, पारंपरिक नृत्य आणि आधुनिक पद्धतीनं हा सण साजरा केला जातो.
९) नैऋत्य भारत
नैऋत्य भारतात होळी म्हणजे काय ते माहीत नाही?, असंही म्हटलं जातं. मात्र तिथेही इंफाळपासून ते गुवाहाटीपर्यंत सगळीकडे जोरदार होळी साजरी केली जाते. कारण हा सणच असा आहे जिथे कोणताच भेदभाव किंवा दुरावा न मानता, फक्त बुरा ना मानो होली है, असं म्हणत एकमेकांना रंग लावले जातात.
कारण हे सणच अशी गोष्ट आहे की ते देशाला एकत्र आणतात. त्यामुळे ज्यांना असं वाटतं की तिथे होळी साजरी होत नाही, त्यांचा तो गैरसमजच असावा.
१०) जम्मु-काश्मीर
सतत फक्त दहशतीत जगणाऱ्या जम्मु काश्मीरच्या लोकांना या होळीमुळे जीवनात थोडा आनंद मिळतो. या सणांच्या काळात तरी इतरांसोबत मिसळण्याची, सुख-दु:ख वाटण्याची संधी त्यांना मिळते. ते क्षण ते आनंदाने अनुभवतात आणि आयुष्याच्या कटू सत्याला सामोरं जाण्यासाठी सज्ज तयार होतात.
तर मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगितलं की देशभरात कशी साजरी होते होळी! तुम्हालासुद्धा अशा काही वेगळ्या प्रथा माहीत असतील तर आम्हाला नक्की कळवा. होळीचे असे अनेक लेख वाचा आणि मित्रांसोबत शेअर करा. तुम्हा सर्वांना आमच्यातर्फे होळीच्या रंगीत शुभेच्छा!
फोटो सौजन्य - www.scoopwhoop.com