हॉलीवूडपासून हरिद्वारपर्यंत योग, आयुर्वेदाची चर्चा, कोरोनाविरोधातील लढाईत मोदींनी विषद केलं महत्त्व
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2020 12:30 PM2020-05-31T12:30:29+5:302020-05-31T12:34:12+5:30
त्याबरोबरच कोरोनाविरोधातील लढाईमध्ये योग आणि आयुर्वेदाच्या उपयुक्ततेची जगभरात चर्चा असल्याचे मोदींनी सांगितले
नवी दिल्ली - सध्या संपूर्ण जग कोरोना विषाणूविरोधात लढाई लढत आहे. भारतातही कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गंभीर रूप धारण करत आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांशी संवाद साधला. आता देश हळूहळू अनलॉक होत असल्याने अधिक खबरदारी घेण्याची गरज असल्याचे मोदींनी सांगितले. त्याबरोबरच कोरोनाविरोधातील लढाईमध्ये योग आणि आयुर्वेदाच्या उपयुक्ततेची जगभरात चर्चा असल्याचे ते म्हणाले.
मन की बात च्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधताना मोदी म्हणाले की, कोरोनाच्या या संकटाच्या परिस्थितीत माझी जगातील अनेक नेत्यांशी चर्चा होत आहे. या काळात जगातील अनेक नेत्यांनी योग आणि आयुर्वेदाबाबत उत्सुकता व्यक्त केली आहे. अनेक जणांना योग आणि आयुर्वेदाबाबत अधिकाधिक जाणून घ्यायचे आहे. हॉलीवूडरपासून हरिद्वारपर्यंत याबाबत उत्सुकता दिसून येत आहे.
ज्यांनी कधीही योग केला नाही ते योगचे ऑनलाईन धडे घेत आहेत. ऑनलाईन व्हिडिओमधून योग शिकत आहेत. कोरोनाच्या संकटकाळाता योगचे महत्त्व वाढत आहे कारण कोरोना विषाणू हा आपल्या श्वसनप्रणालीवर हल्ला करतो. योगमध्ये श्वसनप्रणाल मजबूत करणाऱ्या अनेक प्राणायामांचा उल्लेख आहे. ही टाइम टेस्टेड प्रणाली आहे. कपालभाती आणि अनुलोम विलोम प्राणायामाबाबत अनेकांना माहिती असेलच. पण भस्त्रिका, शीतली, भ्रामरीसारखे अनेक प्राणायामाचे प्रकार आहेत ज्याचे अनेक फायदे आहेत, असेही मोदींनी पुढे सांगितले.
दरम्यान, आज मन की बातच्या माध्यमातून संवाद साधताना मोदीनी सांगितले की, मी गेल्या वेळी मन की बातच्या माध्यमातून जेव्हा संवाद साधला होता, तेव्हा देशातील बहुतांश व्यवहार बंद होते. मात्र आता देशाच्या अर्थव्यवस्थेचे चक्र पुन्हा एकदा फिरू लागले आहेत. सर्व खबरदारी घेऊन रेल्वे आणि विमान सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे आता अनलॉक-१ च्या काळात आपल्याला अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. आता सहा फुटांचे अंतर आणि मास्क परिधान करणे गरजेचे आहे.