"या" शहरात सुरु झाली डिझेलची होम डिलिव्हरी

By Admin | Published: June 22, 2017 11:21 AM2017-06-22T11:21:56+5:302017-06-22T11:24:10+5:30

पेट्रोल पंपावर लागणा-या लांब रांगा टाळण्याच्या हेतूने तेल मंत्रालयाने पेट्रोल, डिझेलची होम डिलिव्हरी करता येईल का यादृष्टीने विचार सुरु केला होता

Home Delivery of Diesel Launched in "The City" | "या" शहरात सुरु झाली डिझेलची होम डिलिव्हरी

"या" शहरात सुरु झाली डिझेलची होम डिलिव्हरी

googlenewsNext
ऑनलाइन लोकमत
बंगळुरु, दि. 22 - दूध आणि वर्तमानपत्राप्रमाणे डिझेलची होम डिलिव्हरी करणारं बंगळुरु देशातील पहिलं शहर बनलं आहे. काही आठवड्यांपूर्वी केंद्र सरकार अशाप्रकारची योजना सुरु करण्याचा विचार करत असल्याची घोषणा पेट्रोलिअम मंत्रालयाने केली होती. फक्त एका वर्षांपुर्वी सुरु झालेल्या स्टार्टअपने 15 जूनपासून 950 लीटर क्षमता असलेल्या वाहनांमधून डिझेलची होम डिलिव्हरी सुरु केली आहे. 
 
(लवकरच मिळणार पेट्रोल, डिझेलची होम डिलिव्हरी)
 
कंपनीने आतापर्यंत 5000 लीटर डिझेलची होम डिलिव्हरी केली आहे. डिझेलचे भाव रोज बदलत असल्याने त्यादिवशी असलेला भाव आणि डिलिव्हरी चार्ज एकत्रित केला जात आहे. 100 लीटर डिझेलची होम डिलिव्हरी करण्यासाठी 99 रुपये आकारले जात आहेत. तर 100 लीटरहून जास्त असल्यास डिझेलच्या किंमतीसह प्रती लिटरमागे एक रुपया आकारला जात आहे. स्टार्टअपला 20 मोठे ग्राहक मिळाले असून यामध्ये 16 शाळा आणि काही अपार्टमेंट्सचा समावेश आहे. 
 
डिझेल मागवण्यासाठी ऑनलाइन ऑर्डर दिली जाऊ शकते. तसंच फोन कॉल किंवा फ्री अॅप डाऊनलोड करुनही ऑर्डर देऊ शकतात. माय पेट्रोलपंपचे संस्थापक आशिष कुमार गुप्ता यांनी सांगितलं आहे की, "आम्ही सप्टेंबर 2016 पासून पेट्रोलिअम मंत्रालयाच्या संपर्कात आहोत. अधिका-यांशी बातचीत केल्यानंतर पेट्रोलिअम मंत्री धर्मेद्र प्रधान यांच्यासोबत आमच्या दोन बैठका पार पडल्या. त्यांनी आमच्या या उपक्रमाचं कौतुक केलं. 
 
फक्त डिझेलची होम डिलिव्हरी का केली जाते असं विचारला असता, आशिष गुप्ता यांनी सांगितलं की, "पेट्रोल फक्त दुचाकी आणि चारचाकी वाहनांमध्ये वापरलं जातं. मात्र डिझेलचा वापर अनेक व्यवसाय, कृषी कामांसाठी केला जातो. देशात वर्षाला 22 मिलिअन मेट्रिक टन पेट्रोलच्या तुलनेत 77 मिलिअन मेट्रिक टन डिझेलचा खप होतो. भविष्यात आम्ही पेट्रोलचीदेखील होम डिलिव्हरी सुरु करु". 
 
पेट्रोल पंपावर लागणा-या लांब रांगा टाळण्याच्या हेतूने तेल मंत्रालयाने पेट्रोल, डिझेलची होम डिलिव्हरी करता येईल का यादृष्टीने विचार सुरु केला होता. मंत्रालयाने यासंबंधी ट्विट करत प्री-बूकिंग केल्यास ग्राहकांना तेल उत्पादनांची होम डिलिव्हरी करण्यासंबंधी पर्यायांचा विचार सुरु असल्याचं सांगितलं होतं. दररोज किमान 350 कोटी लोक पेट्रोल पंपांवर जात असतात. पेट्रोल पंपावर वर्षभरात किमान 2 हजार 500 कोटींची उलाढाल होत असते. 

Web Title: Home Delivery of Diesel Launched in "The City"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.