गृहकर्ज इच्छुक वाढले
By admin | Published: January 9, 2017 01:26 AM2017-01-09T01:26:14+5:302017-01-09T01:26:14+5:30
एसबीआय बँकेने गृह कर्जाच्या दरात कपात केल्यानंतर या कर्जाबाबत नागरिकांतून तीन पट अधिक चौकशी वाढली आहे.
हैदराबाद : एसबीआय बँकेने गृह कर्जाच्या दरात कपात केल्यानंतर या कर्जाबाबत नागरिकांतून तीन पट अधिक चौकशी वाढली आहे. बँकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली. गत आठवड्यात बँकेने गृह कर्जाच्या दरात ०.९० टक्के कपात केली आहे. याशिवाय इतर बँकांनीही व्याजदर कमी केल्याने कर्ज घेण्यासाठीच्या इच्छुकांची संख्या वाढल्याचे चित्र आहे.
एसबीआयच्या नॅशनल बँकिंगचे व्यवस्थापकीय संचालक रजनीश कुमार यांनी सांगितले की, ८ नोव्हेंबरच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर कर्जाच्या मागणीत वाढ झालेली दिसत नाही. पण, मागच्या आठवड्यात बँकेने कर्जाच्या दरात कपात केल्यानंतर प्रत्यक्ष वा आॅनलाइन चौकशीत तीन पट वाढ झाली आहे. कर्जाच्या मागणीवरच आम्ही आता लक्ष केंद्रित केले आहे.
रजनीश कुमार म्हणाले की, जर कर्जाची मागणी वाढत असेल तर संपूर्ण अर्थव्यवस्थेसाठी ती सकारात्मक बाब असेल. डेबिट आणि अन्य कार्डच्या वापरातही मोठी वाढ झाली आहे. व्यापारी वर्गातही ई-वॉलेट आणि अन्य कॅशलेस व्यवहारांत वाढ झाली आहे. या बँकेने नोटाबंदीनंतर ४५ हजार पीओएस मशिनचे वाटप केले आहे. गत वर्षी बँकेने एक लाख पीओएस मशिनचे उद्दिष्ट ठेवले होते. यंदा ते दुपटीने वाढविले आहे.
रिझर्व्ह बँकेच्या एका ताज्या आकडेवारीनुसार, गत अनेक वर्षांत प्रथमच या डिसेंबरमध्ये गृह कर्जाची मागणी अतिशय कमी झालेली आहे. परंतु, आता एसबीआयने गृह कर्जाच्या व्याजदरात कपात केल्यानंतर मोठ्या संख्येने नागरिक गृह कर्जाबाबत विचारणा करीत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन आणि जुने कर्जदारही येथे विचारणा करीत आहेत. अन्य बँकांचे गृह कर्जाचे दर हे एसबीआयच्या तुलनेत काही प्रमाणात जास्त आहेत. ज्या खासगी बँकांकडून नागरिकांनी गृह कर्ज घेतले आहे ते आता लोन ट्रान्स्फरच्या पर्यायाकडे पाहत आहेत. (वृत्तसंस्था)
असे आहेत एसबीआयचे गृह कर्जाचे दर
च्एसबीआयच्या वेबसाईटवर गृह कर्जाचे दर अपडेट करण्यात आले आहेत. जानेवारी २०१७पासून यात बदल करण्यात आल्याचे दिसत आहे. हे दर ८.६० ते ८.७० टक्के आहेत.
च्म्हणजेच एक लाखासाठी 776 रुपये असा ईएमआय आहे. कर्ज परतफेडीचा कालावधी ३० वर्षांपर्यंत आहे. प्रोसेसिंग फी ०.३५ टक्के आहे.