गृहकर्ज आणखी महागले; कर्जदारांना फटका बसणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2022 11:12 AM2022-06-02T11:12:41+5:302022-06-02T11:15:02+5:30
नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी खासगी बँक एचडीएफसीसह काही बँकांनी आपल्या गृहकर्जाच्या व्याजदरात पुन्हा एकदा वाढ केली आहे. ...
नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी खासगी बँक एचडीएफसीसह काही बँकांनी आपल्या गृहकर्जाच्या व्याजदरात पुन्हा एकदा वाढ केली आहे. एचडीएफसीने गृह कर्जासाठी रिटेल प्राईम लेंडिंग रेट (आरपीएलआर) मध्ये ५ बेसिस पॉईंटची वाढ केली आहे. एका महिन्यात बँकेकडून ही तिसरी वाढ असून, कर्जदारांना त्याचा फटका बसणार आहे.
एचडीएफसीसह पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) आणि आयसीआयसीआय बँकेनेही एमसीएलआरमध्ये १५ बेसिस पॉईंटने वाढ केली आहे. गेल्या महिन्यात एचडीएफसी बँकेने दोन वेळा व्याज दरात वाढ केली होती. जर एखाद्या ग्राहकाचा क्रेडिट स्कोअर ७८०पेक्षा अधिक असेल, तर त्याला कमीत कमी व्याजदर ७.०५ टक्के असेल, जो यापूर्वी ७ टक्के होता.
नवीन दर १ जून २०२२पासून लागू होणार आहेत. एका महिन्यात बँकेने एकूण ४० बेसिस पॉईंटने वाढ केली आहे. १ मे रोजी एचडीएफसीने व्याज दरात ५ बेसिस पॉईंटची वाढ केली होती. यानंतर ७ मे रोजी ३० बेसिस पॉईंटची वाढ करण्यात आली होती. त्याचा फटका ग्राहकांना बसत आहे.
आणखी महागणार...
रिझर्व्ह बँकेने रेपो दरात ०.४० टक्क्यांनी वाढ केली होती. नवीन रेपो दर ४ टक्क्यांवरून ४.४ टक्के झाला आहे. रेपो दर वाढल्याने सर्व बँकांनी गृह कर्जाच्या दरात वाढ करणे सुरू केले आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ करण्याचे संकेत दिले आहेत.