...तर आणखी सर्जिकल स्ट्राईक करू; अमित शाह यांचा पाकिस्तानला थेट इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2021 05:07 PM2021-10-14T17:07:47+5:302021-10-14T17:08:20+5:30
पाकिस्ताननं मर्यादेत राहावं, अन्यथा परिणाम भोगावे लागतील; शाह यांचा थेट इशारा
नवी दिल्ली: पाकिस्ताननं मर्यादेत राहावं. काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून सुरू असलेल्या नागरिकांच्या हत्यांचं पाकिस्तानकडून समर्थन सुरू आहे. दहशतवादी सीमा ओलांडून घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत. हीच परिस्थिती राहिली तर आम्ही सीमा ओलांडून पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करू, असा थेट इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिला आहे. धारबंदोरातील नॅशनल फॉरेन्सिक सायन्सेस युनिव्हर्सिटीच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते.
पूँछमध्ये हल्ला झाल्यानंतर पहिल्यांदा सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला. भारत सुरक्षेबद्दल जराही तडजोड करणार नाही असा संदेश त्यावेळी आपण जगाला दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्या नेतृत्त्वाखाली सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला. भारताच्या सीमांशी छेडछाड करणं सोपं नाही आणि आम्ही आमच्या सीमांचं रक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहोत हा संदेश सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातून आपण पहिल्यांदाच जगाला अतिशय स्पष्टपणे दिला, असं शाह म्हणाले.
संपूर्ण देश मनोहर पर्रिकरांना दोन गोष्टींसाठी लक्षात ठेवेल. त्यांनी गोव्याला ओळख मिळवून दिली. संरक्षण मंत्री असताना त्यांनी तिन्ही संरक्षण दलांसाठी वन रँक वन पेन्शन योजना आणली. त्याचा लाभ हजारो निवृत्त जवानांना झाला. पर्रिकरांचं हे योगदान देश कायम लक्षात ठेवेल, असं शाह यांनी म्हटलं.