“सत्तेसाठी नितीश कुमार सोनिया गांधींच्या चरणी गेले, आता भाजपचे दरवाजे बंद”
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2023 02:51 PM2023-02-25T14:51:53+5:302023-02-25T14:54:03+5:30
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नितीश कुमार यांच्यावर निशाणा.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शनिवारी बिहार दौऱ्यावर आले होते. त्यांनी बिहारमधील पश्चिम चंपारण जिल्ह्यातील एका जाहीर सभेला संबोधित केलं. “आज मी चंपारणच्या पवित्र भूमीवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. पूर्ण बहुमत असलेलं भाजप सरकारच बिहारला विकास आणि समृद्धीच्या मार्गावर नेऊ शकतं. अजलौरिया, पश्चिम चंपारण येथे आयोजित केलेल्या या विशाल जनसभेला संबोधित करताना खूप आनंद होत आहे,” असं अमित शाह यावेळी म्हणाले.
“गेल्या विधानसभा निवडणुकीत जनतेनं भाजपला सर्वात मोठा पक्ष बनवलं होतं. डबल इंजिनचं सरकार चांगल्या प्रकारे चालावं, यासाठी आम्ही आमच्या शब्दानुसार नितीश कुमार यांना मुख्यमंत्री बनवलं. परंतु नितीश बाबूंना दर तीन वर्षांनी पंतप्रधान बनण्याचं स्वप्न पडतचं. ते जंगलराजचे प्रणेते लालू प्रसाद यादव यांच्यासह गेले. सत्तेसाठी नितीश कुमार काँग्रेसच्या सोनिया गांधींच्या चरणी गेले. अनेक वर्ष ‘आयाराम गयाराम’ केलं. पण आता भाजपचे दरवाजे तुमच्यासाठी आयुष्यभरासाठी बंद आहेत,” असं अमित शाह म्हणाले.
सोनिया गांधींच्या चरणी गेले
“मी बिहारच्या जनतेला आवाहन करण्यासाठी आलोय, जेदयूआणि आरजेडीची अपवित्र आघाडी पाणी आणि तेलासारखी आहे. यामध्ये जदयू पाणी आमि आरजेडी तेल आहे. हे दोन्ही कधी एकत्र मिसळू शकत नाहीत. नितीश कुमार यांनी बनावट मद्यावरही आपलं तोंड बंद केलंय,” असं ते म्हणाले.
The sale of fake liquor must be stopped. PM Modi gave 3 projects worth Rs 15,000 crores to Bihar. When Lalu Yadav & Nitish Kumar were in the Union Ministry under the UPA government how much money did they give to Bihar? Modi Ji gave Rs 1,09,000 crore:Union Home Minister Amit Shah pic.twitter.com/UxFToBEhIW
— ANI (@ANI) February 25, 2023
बिहारमध्ये अराजकता
“आज संपूर्ण बिहारमध्ये अराजकता निर्माण झाली आहे. गुन्हेगारी पुन्हा डोकं वर काढत आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होतोय. हत्या, अपहरण, बलात्कार, दरोड्यांसारखे गुन्हे वाढू लागलेत. यावेळी असा धडा शिकवा की बिहारमध्ये पक्ष बदलणारे शांत होतील. मोदींच्या नेतृत्वााखाली दोन तृतीयांश बहुमतानं भाजपचं सरकार बनवणं आणि मोदींना पंतप्रधान बनवणं हा यातून मुक्ती मिळवण्याचा मार्ग आहे,” असं अमित शाह यांनी स्पष्ट केलं.