राज्यपाल कोश्यारी यांच्यावर गृहमंत्री शहा नाराज, मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात काही उल्लेख टाळायला हवे होते
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2020 01:49 AM2020-10-19T01:49:04+5:302020-10-19T07:03:47+5:30
महाराष्ट्राला कोरोनाच्या संसर्गाचा मोठा फटका बसला आहे. या कोरोना साथीचे का रण सांगत महाराष्ट्रातील प्रार्थनास्थळे अद्यापही बंदच ठेवल्याबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नाराजी व्यक्त करणारे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काही दिवसांपूर्वी लिहिले होते. (Home Minister Shah)
नवी दिल्ली : ‘तुम्हाला सेक्युलर शब्दाचा तिटकारा होता. मग आता अचानक तुम्ही सेक्युलर झालात का?’ असा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासंदर्भात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एका पत्रामध्ये केलेला उल्लेख टाळायला हवा होता, असे मत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या उल्लेखाने शहा नाराज झाले आहेत.
महाराष्ट्राला कोरोनाच्या संसर्गाचा मोठा फटका बसला आहे. या कोरोना साथीचे कारण सांगत महाराष्ट्रातील प्रार्थनास्थळे अद्यापही बंदच ठेवल्याबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नाराजी व्यक्त करणारे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काही दिवसांपूर्वी लिहिले होते. त्या पत्रावरून मोठा वाद झाला होता. राज्यात घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तीने मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात अशा प्रकारची भाषा असावी का, यावरही खूप चर्चा झडली होती. त्यानंतर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अमित शहा यांनी आपले मत व्यक्त केले की, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना आपली भावना अधिक उत्तम शब्दांत व्यक्त करता आली असती.
या पत्रात भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना म्हटले होते की, मुख्यमंत्री होताच तुम्ही अयोध्येचा दौरा केला होता. आषाढी एकादशीला पंढरपूरला जाऊन विठ्ठलाची पूजाही केली होती. तुम्ही स्वत:ला रामभक्त म्हणवता व मग आता तुम्हाला प्रार्थनास्थळे खुली करण्यासाठी दैवी संकेत मिळणार आहेत का?
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पाठविलेल्या पत्राला उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, माझ्या हिंदुत्त्वाला कोणाच्याही प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी लिहिलेल्या पत्रात मुख्यमंत्र्यांबाबत जे उद्गार काढले त्याविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाराजी व्यक्त करणारे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविले होते.
शेरेबाजी अयोग्य -
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात कोश्यारी यांनी केलेली शेरेबाजी अयोग्य होती. त्यांनी त्या पत्रामध्ये काही शब्द वापरले नसते तर बरे झाले असते.