मोदींच्या जीवाला मोठा धोका; गृह मंत्रालयानं दिला रोड शो टाळण्याचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2018 05:15 PM2018-06-26T17:15:58+5:302018-06-26T17:16:08+5:30
एसपीजीच्या परवानगीशिवाय मंत्री, अधिकाऱ्यांना मोदींना भेटता येणार नाही
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवाला मोठा धोका असल्याचं गृह मंत्रालयानं म्हटलं आहे. त्यामुळे मंत्रालयाकडून सर्व राज्यांना अलर्ट पाठवण्यात आला आहे. मोदींच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या एसपीजीच्या परवानगीशिवाय कोणत्याही मंत्र्याला आणि अधिकाऱ्याला मोदींची भेट घेता येणार नाही, असं या अलर्टमध्ये गृह मंत्रालयानं म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचे रोड शो कमी करावेत, असा सल्ला सुरक्षा यंत्रणांकडून देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीला वर्षभराचा कालावधीदेखील शिल्लक राहिलेला नाही. त्यामुळे मोदींचे झंझावाती दौरे सुरू होणार आहेत. या पार्श्वभूमीवर मोदींना चोख सुरक्षा पुरवण्याचं आव्हान सुरक्षा दलांसमोर असेल. आगामी लोकसभा निवडणुकीत मोदीच भाजपाचा चेहरा असणार आहेत. त्यामुळे लवकरच त्यांच्या प्रचार दौऱ्यांना सुरुवात होईल.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गृह मंत्रालयाकडून सर्व राज्यांमधील डीजीपींना पत्र पाठवण्यात आले आहे. मोदींना अज्ञात व्यक्तीकडून धोका असल्याचं यामध्ये नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे यापुढे मोदींची भेट घेण्यासाठी कोणत्याही मंत्र्याला आणि अधिकाऱ्याला त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणाऱ्या यंत्रणेची परवानगी आवश्यक असेल. याशिवाय मोदींच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले एसपीजीचे जवान मंत्र्यांची झडतीदेखील घेऊ शकतात. मोदी अनेकदा कार्यक्रमानंतर, रोड शो दरम्यान सर्वसामान्य लोकांना जाऊन भेटतात. मोदींनी सर्वसामान्यांना अशाप्रकारे भेटणं टाळावं, असा सल्ला सुरक्षा यंत्रणांकडून देण्यात आला आहे.