NRC : संपूर्ण देशभरात एनआरसी लागू करण्याबाबत गृहमंत्रालयाने लोकसभेत केली मोठी घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2020 01:38 PM2020-02-04T13:38:23+5:302020-02-04T13:38:49+5:30
NRC News : केंद्र सरकारच्या विचाराधीन असलेल्या एनआरसी कायद्याविरोधात सध्या देशातील बहुतांश भागात तीव्र आंदोलने सुरू आहेत.
नवी दिल्ली - केंद्र सरकारच्या विचाराधीन असलेल्या एनआरसी कायद्याविरोधात सध्या देशातील बहुतांश भागात तीव्र आंदोलने सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात एनआरसी लागू करण्याबाबत गृहमंत्रालयाने लोकसभेत मोठी घोषणा केली आहे. संपूर्ण देशात एनआरसी लागू करण्याचा निर्णय आतापर्यंत झालेला नाही, अशी माहिती गृहमंत्रालयाने आज लोकसभेत दिली.
नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीविरोधात देशभरात सध्या तीव्र आंदोलने होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून केंद्रात सत्तेवर असलेल्या मोदी सरकारवर टीका करण्यात येत होती. या संदर्भात चंदन सिंह आणि नागेश्वर राव या खासदारांनी सरकारला प्रश्न केले होते. एनआरसी लागू करण्यासाठी सरकारकडून पावले उचलण्यात येत आहेत का? याबाबत राज्य सरकारांशी चर्चा झाली आहे का? अशी विचारणा या खासदारांनी केली होती. त्याला आज केंद्र सरकारकडून उत्तर देण्यात आले.
केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी याबाबत लोकसभेमध्ये लिखित उत्तर दिले आहे. आतापर्यंत भारत सरकारने एनआरसी देशभरात लागू करण्याबाबत कुठलाही निर्णय घेतलेला नाही, असे या उत्तरात म्हटले आहे. एनआरसीबाबत गृहमंत्री अमित शाह आज लोकसभेमध्ये उत्तर देणार होते. मात्र लोकसभेमधील गोंधलामुळे त्यांना आपले म्हणणे मांडता आले नाही. त्यानंतर लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी सभागृहाचे कामकाज स्थगित केले होते. त्यानंतर कामकाजाला पुन्हा सुरुवात झाल्यावर गृहमंत्रालयाने आपले म्हणणे लेखी स्वरुपात पटलावर मांडले.