'पीएमओ'नंतर गृहमंत्रालय सर्वाधिक सक्रीय, अमित शाह यांच्याकडे मंत्र्यांची वर्दळ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2019 04:43 PM2019-06-05T16:43:48+5:302019-06-05T17:31:46+5:30
अमित शाह यांच्या कार्यालयात मंगळवारी एकापाठोपाठ एक अनेक बैठका झाल्या. यामध्ये विदेश मंत्री एस. जयशंकर, अर्थमंत्री निर्मला सीतारमण, वाणिज्य आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान सामील झाले होते.
नवी दिल्ली - राजधानी दिल्लीतील उत्तर ब्लॉकमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. पुन्हा एकदा सत्तेत आलेल्या भाजपच्या कार्यकाळाची सुरुवात झाली आहे. मात्र यामध्ये सध्या तरी गृहमंत्रालय सर्वाधिक सक्रीय दिसत आहे. गेल्या आठवड्यात अमित शाह यांनी गृह मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला आहे. तेव्हापासून शाह यांच्याकडे मंत्री, मुख्यमंत्री आणि राज्यपालांची वर्दळ वाढली आहे.
आतापर्यंत केंद्रात पंतप्रधान कार्लालयानंतर प्रत्येक सरकारमधील अर्थखाते महत्त्वपूर्ण ठरत होते. किंबहुना अर्थमंत्रालयात विविध मंत्र्यांची वर्दळ दिसत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागील कार्यकाळात माजी अर्थमंत्री अरुण जेठली यांच अर्थखाते केंद्रस्थानी होते. परंतु यावेळी सरकारमध्ये गृहखातं केंद्रीबिंदू ठरत आहे.
अमित शाह यांच्या कार्यालयात मंगळवारी एकापाठोपाठ एक अनेक बैठका झाल्या. यामध्ये विदेश मंत्री एस. जयशंकर, अर्थमंत्री निर्मला सीतारमण, वाणिज्य आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान सामील झाले होते. यापैकी कुणीही शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीसंदर्भात फारशी माहिती दिली नाही. गोयल आणि प्रधान यांनी सांगितले की, आपण केवळ चहा पिण्यासाठी आलो होतो.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही वेळाने नीती आयोगाच्या अधिकाऱ्यांची देखील अमित शाह यांच्यासोबत बैठक झाली. यावेळी पेट्रोलियम मंत्रालयाच्या तांत्रिक बाबींवर चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.
मोदींच्या दुसऱ्या कार्यकाळात अमित शाह यांना केंद्रीयमंत्रीमंडळात स्थान देण्यात आले आहे. राजनाथ सिंह यांचे गृहखाते अमित शाह यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. तर संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी राजनाथ सिंह यांच्याकडे सोपविण्यात आली असून माजी संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडे अर्थखाते देण्यात आले आहे. तर मंत्री झालेले अमित शाह अद्याप पक्षाध्यक्षपदी कायम आहेत.