निमलष्करी दलांमध्ये तृतीयपंथीयांनाही मिळणार संधी?; मोदी सरकार घेऊ शकतं ऐतिहासिक निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2020 02:57 PM2020-07-02T14:57:49+5:302020-07-02T15:21:14+5:30
गृह मंत्रालयानं निमलष्करी दलांकडून मागवल्या सूचना
नवी दिल्ली: निमलष्करी दलांमध्ये तृतीयपंथीयांना संधी देण्याचा विचार सुरू आहे. यासाठी गृह मंत्रालयानं विविध दलांच्या सूचना आणि शिफारसी मागवल्या आहेत. पुरुष आणि महिला यांच्यासोबत तृतीयपंथीयांनादेखील निमलष्करी दलांमध्ये सहभागी करून घेण्यासाठी नियमांची पडताळणी करण्याच्या सूचना गृह मंत्रालयाकडून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या (सीएपीएफ) परीक्षेच्या नियमांमध्ये बदल होण्याची दाट शक्यता आहे.
Union Home Ministry has asked CRPF, ITBP, SSB & CISF to examine the issue of incorporating 'transgender' as Third gender along with Male/Female in the rules of CAPF(AC') Examination 2020; asks the forces to furnish comments to take final view on the matter. pic.twitter.com/QMU1ctaat9
— ANI (@ANI) July 2, 2020
निमलष्करी दलांमध्ये तृतीयपंथीयांना संधी देण्याचा विचार गृह मंत्रालयाकडून अतिशय गांभीर्यानं सुरू आहे. यासाठी गृह मंत्रालयानं विविध विभागांकडून त्यांची मतं मागवली आहेत. यामध्ये इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलीस (आयटीबीपी), सीमा सुरक्षा दल (बीएसएफ), सशस्त्र सीमा दल (एसएसबी) आणि केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) यांचा समावेश आहे. गृह मंत्रालयानं या विभागांकडून विस्तृत अहवाल मागितला आहे. त्यानंतर गृह मंत्रालय यासंबंधीचा निर्णय घेईल.
गृह मंत्रालयाला निमलष्करी दलांनी सकारात्मक अहवाल दिल्यास चीनला लागून असलेल्या भारताच्या सीमेवर तृतीयपंथी अधिकारी तैनात होतील. आयटीबीकडे भारत-चीन सीमेची जबाबदारी आहे. याशिवाय पाकिस्तान सीमेवरही तृतीयपंथीय अधिकारी कर्तव्य बजावताना दिसतील. देशातील नक्षलग्रस्त भागांची जबाबदारीदेखील त्यांच्याकडे सोपवण्यात येईल.
गृह मंत्रालयानं केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाकडे (सीएपीएफ) या प्रकरणी विस्तृत अहवाल मागितला आहे. हा अहवाल आल्यानंतर निवड प्रक्रियेत आवश्यक बदल केले जातील, अशी माहिती गृह मंत्रालयानं दिली. आयटीबीपी, बीएसएफ, एसएसबी, सीआरपीएफ यांचा समावेश निमलष्करी दलांमध्ये होतो. हे सर्व विभाग गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येतात. देशांतर्गत महत्त्वाच्या भागांसह सीमावर्ती भागात या विभागांचे जवान महत्त्वाची कामगिरी बजावतात.
भारताच्या दोन मित्रांचा इरादा पक्का; शेवटच्या क्षणी चीनला जोरदार धक्का
"चीनच्या आक्रमकतेसमोर झुकणार नाही हे भारताने दाखवून दिलं"