Coronavirus : कोरोनावर अलर्ट, केंद्रीय गृह सचिवांचं राज्यांना पत्र; म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2021 09:12 AM2021-02-27T09:12:28+5:302021-02-27T09:15:23+5:30
Coronavirus ; केंद्रीय गृह सचिव अजल भल्ला यांनी राज्यांना लिहिलं पत्र
काही महिन्यांपूर्वी देशातील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्यानं कमी होत होती. परंतु गेल्या काही दिवसांपासून कोरोनानं पुन्हा डोकं वर काढण्यास सुरूवात केली आहे. देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढही होताना दिसत आहे. अशा परिस्थिती केंद्र सरकारनं आता कठोर भूमिका घेतली आहे. केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना एक पत्र लिहिलं आहे. तसंच कोरोना विषाणूबाबतच्या मार्गदर्शक सूचनांतं ३१ मार्चपर्यंत पालन करण्याचे आदेश दिले आहे. कोरोना विषाणूविरोधातील लढाई पूर्णपणे जिंकण्यासाठी खबरदारी घेणं आणि कठोरपणे देखरेख ठेवण्याची आवश्यकता असल्याचं त्यांनी पत्रात नमूद केलं आहे.
'गेल्या काही महिन्यांमध्ये कोरोनाबाधितांच्या सख्येत घट दिसून आली आहे. परंतु कोरोनाच्या विरोधातील लढाई जिंकण्यासाठी आताही आपल्याला कठोर देखरेख आणि खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. २७ जानेवारी २०२१ रोजी जारी करण्यात आलेले आदेश ३१ मार्च २०२१ पर्यंत वाढवण्यात येत आहेत,' असं गृह सचिवांच्यावतीनं पत्रात नमूद करण्यात आलं आहे.
सामान्यांना माहिती द्या
एसओपीअंतर्गत येणाऱ्या सर्व गोष्टींना यात परवानगी देण्यात आली आहे. तसंच एसओपी अंतर्गत जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन कठोरपणे केलं गेलं पाहिजे. परिवहन आणि सामान्य लोकांच्या आंतरराज्यीय ये-जा करण्यावर रोखण्यात येणार नसल्याचंही पत्रात नमूद केलं आहे. दरम्यान, राज्यांमधील संबंधित प्राधिकरणांनी केंद्राच्या मार्गदर्शक सूचनांचं कठोरपणे पालन करायला लावावं. तसंच केंद्रानं दिलेल्या मार्गदर्शक सूचनांबाबत सामान्यांना माहिती दिली जावी, जेणेकरून ते लागू करण्यास समस्या निर्माण होणार नाही आणि ते थांबवण्यास मदतही मिळेल, असंही पत्रात सांगण्यात आलं आहे.