‘घरी : द सर्जिकल स्ट्राइक’
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2019 12:30 PM2019-08-25T12:30:24+5:302019-08-25T12:30:37+5:30
हा संवाद संपूर्णपणे काल्पनिक असला तरी तो वास्तवातल्या दोन अधिकाऱ्यांमध्ये घडलाच नसेल, अशी गॅरंटी खुद्द ब्रह्मदेवही देऊ शकणार नाही, तर लेखक कुठून देणार?
- मुकेश माचकर
हा संवाद संपूर्णपणे काल्पनिक असला तरी तो वास्तवातल्या दोन अधिकाऱ्यांमध्ये घडलाच नसेल, अशी गॅरंटी खुद्द ब्रह्मदेवही देऊ शकणार नाही, तर लेखक कुठून देणार?… मात्र, तसं झाल्यास निव्वळ योगायोग समजावा आणि कोणत्याही यंत्रणेने उगाच आमच्या घराच्या कुंपणावरून अपरात्री उड्या मारण्याचा विचार करू नये… आम्ही सातव्या मजल्यावर राहतो… तिथे लिफ्टही येते, जिनाही येतो, भिंतींवरून येणार असाल, तर वरून पडण्याची शक्यता आहे… डोक्यावर पडल्याने तुम्हाला काही होत नाही, सराव आहे, हे माहिती आहे, पण हातापायांची हाडं मोडू शकतात… या संवादातले अधिकारी या विभागाचे आहेत की त्या विभागाचे आहेत की आणखी वेगळे कुठले आहेत, याने काही फरक पडत नाही… मालकाच्या हातची मिरची गोड आहे असं सांगून भाजलेल्या तोंडाने मिठुमिठू गाणारे पोपट कोणत्या पिंजऱ्यातले आहेत, याने काय फरक पडतो?
तर संवाद येणेप्रमाणे-
अधिकारी एक : चला, मेसेज आला. अटक करायला निघू या…
अधिकारी दोन : सर, निघण्याच्या आधी एक फोन केला तर?
अधिकारी एक : कोणाला?
अधिकारी दोन : ज्यांना अटक करायला निघालोय त्यांना.
अधिकारी एक : त्यांना कशाला फोन करायचा. पळून जाण्याची संधी द्यायला. तुम्ही आपल्या कामावर निघालेले अलीकडचे सिनेमे पाहिलेले नाहीत का?
अधिकारी दोन : पाहिलेत सर. म्हणूनच सांगतोय की फोन करून पाहिलेला बरा. मागे आपण त्या बंगालच्या चिटफंड घोटाळ्यातल्या आरोपीला असेच चेवाने अटक करायला गेलो आणि तोवर तो वाल्या भाजपमध्ये जाऊन वाल्मिकी बनला होता… तशातला काही प्रकार व्हायला नको… दोन्ही बाजूंनी तोंड आपलंच फुटतं हो सर.
अधिकारी एक : बरोबर आहे तुमचं म्हणणं. पण, हा निरोप ती खातरजमा झाल्याशिवाय आला नसणार. आजकाल मोठे साहेब दोनच ऑप्शन ठेवतात, आमच्यात या, नाहीतर तुरुंगात जा. त्यामुळे ताबडतोब निघू या. पहिला ऑप्शन स्वीकारला गेला असता, तर एव्हाना भारतरत्न जाहीर झालं असतं…
अधिकारी दोन : तेही बरोबर आहे सर. पण, मला वाटतं, निघण्याच्या आधी तुम्ही जरा तुमचं फेसबुक अकाउंट डिलिट केलं तर बरं होईल…
अधिकारी एक : अरेच्चा, तुम्ही तर माझ्या खासगी गोष्टींमध्ये दखल द्यायला लागलात…
अधिकारी दोन : नाही साहेब, गैरसमज करून घेऊ नका… आपल्याला वरून आदेश आला की गरजेपुरतं पेपरवर्क करून ‘दुसऱ्यांच्या’ खासगी भानगडींमध्ये नाक खुपसायला नेमलंय, हे मला माहिती आहे… पण, आजकालचा जमाना सोशल मीडियाचा आहे… तुम्ही कोणाच्या ५० फॅनक्लब्जचे मेंबर आहात, ते लोकांच्या लक्षात आलं तर गहजब होईल. शिवाय भावनेच्या भरात एखाद्या नंबरवर मिस्ड कॉल देऊन पक्षाचं सदस्यत्व वगैरे स्वीकारलं असेल तर तेही सोडलेलं बरं…
अधिकारी एक : अरे हो, तुम्ही म्हणताय त्यात तथ्य आहे… करून टाकतो सगळं डिलिट. मग तरी निघूयात. बरं ते दोर वगैरे मागवलेत की नाही?
अधिकारी दोन : दोर? कशाला?
अधिकारी एक : म्हणजे काय, फरारी गुन्हेगाराला…
अधिकारी दोन : अं अं अं… ट्रोलमंडळींमध्ये उठबस वाढल्यापासून तुम्हाला आरोपी आणि गुन्हेगार यांच्यातला फरक समजेनासा झालाय… सध्या ते नुसतेच आरोपी आहेत…
अधिकारी एक : तेच ते. एकदा मोठ्या साहेबांनी ठरवलं की हा गुन्हेगार आहे की तो गुन्हेगार आहे, देशद्रोही आहे, यावर सगळा देश विश्वास ठेवतो…
अधिकारी दोन : मला खूप हसू येतंय, पण मला नोकरी टिकवायची असल्यामुळे मी ते दाबतो आहे. सगळ्या देशाला काय वाटतं, याच्याशी आपल्या यंत्रणेचा काही संबंध नाही. सध्या आपण त्यांना आरोपी म्हटलेलं बरं…
अधिकारी एक : ओके. तर फरारी आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला तर त्याला पकडण्यासाठी ही सगळी तयारी लागणारच आहे. आपण त्यांच्या बंगल्याच्या भिंती चढून जाऊन त्यांना पकडणार आहोत…
अधिकारी दोन : का बरं? त्यांच्या घराला दरवाजा नाही? ते फरारी आहेत तर थोड्या वेळापूर्वी त्यांनी पत्रकार परिषद कशी घेतली? आताही ते घरी असतील. आपण बेल वाजवली तर दरवाजा उघडतील. कायदेपंडित आहेत, कायद्याला सहकार्य करणार नाहीत का?
अधिकारी एक : ओह गॉड, किती बोअरिंग आहात तुम्ही! कळत नाहीये का तुम्हाला? आपण असे सरळ जाऊन अटक करू तर भविष्यातल्या ‘पी सी फाइल्स’, ‘राज की बात’, ‘ईडीकाडी’, ‘घरी : द सर्जिकल स्ट्राइक’ वगैरे संभाव्य सिनेमांच्या निर्मात्यांना आपण काय तोंड दाखवणार? अक्षय कुमार आपल्याला काय म्हणेल? आपल्याला काय म्हणेल ते सोडा; लोक आपल्याला असेही सरकारचे पाळीव कुत्रे, पोपट असं काहीबाही म्हणत असतात. ते आपण मनावर घेतो का? पण, अक्षय आपल्याला काय म्हणेल यापेक्षा साहेबांना काय सांगेल, याची भीती वाटते.
अधिकारी दोन : हे मात्र तुम्ही बरोबर बोललात. आजकाल बाकीच्यांपेक्षा यांचीच जास्त फिकीर करावी लागते. पण मला एक सांगा साहेब. असाही तो काय किंवा विवेक काय किंवा आणखी कोणी जॉन, जॉनी जनार्दन काय, तिखट मीठ मसाला लावूनच सिनेमा काढणार. त्यांच्या सोयीने प्रसंग निवडणार, त्यांच्या सोयीने इतिहास मांडणार. शिवाय आपण बेल वाजवून शिस्तीत अटक केली तरी अक्षय कुमार या घटनेवरच्या सिनेमात मंगळयानातून उडी मारून राफेल विमानावर उतरणार. ढगांमधून रडारला चुकवत वाट काढत चाललेल्या हेलिकॉप्टरवर उतरणार आणि मग त्याला दोर बांधून लटकून खाली उतरणार… टेरेसवरचा टिकटिक वाजणारा अणुबाँब तो जिवावर उदार होऊन डोकं लढवून लाल वायर तोडून निकामी करणार. मग, एके फॉर्टी सेव्हन घेऊन आलेल्या अतिरेक्यांच्या टोळीचा निव्वळ मार्शल आर्ट्सच्या बळावर बीमोड करणार आणि मग आरोपीला जेरबंद करणार…
अधिकारी एक : करेक्ट…
अधिकारी दोन : मग हे सगळं त्याला करण्यासाठी राखून ठेवू या की. आपण हे सगळं नाटक कशाला करायचं?… आपल्याला भविष्यात ना पद्मभूषण मिळणार आहे ना भारतरत्न?… बाकी जाऊ द्या, आपल्याला कॅनडाचं पर्मनंट नागरिकत्वसुद्धा मिळणार नाही...
अधिकारी एक : ते बरोबर आहे… पण लक्षात घ्या… आपण एका नाटक कंपनीत काम करतो आहोत, हे आता समजून घ्यायला हवं… जेवढा ड्रामा अधिक तेवढं देशाचं लक्ष खेचलं जातं, काहीतरी महान घडतंय, असं देशाला वाटत राहतं… शेवटी काही घडवण्यापेक्षा काहीतरी घडतंय असं वाटायला लावण्यातच खरं कौशल्य असतं… आता पुढे कोर्टात केस चालेल, त्यातून आरोपी सुटतीलही… पण, ते ‘बाइज्जत’ सुटू शकणार नाहीत, इतकी नाट्यपूर्ण बेईज्जत आपण करून ठेवायची… हेच आपलं काम आहे…
अधिकारी दोन (जोशात येऊन) : अंडरस्टूड सर, चला, सर, लगेच निघू या. हवंतर हेलिकॉप्टरला लटकून प्रवेश करायलाही तयार आहे मी आरोपीच्या, आय मीन गुन्हेगाराच्या घरात… आणि सर, माझी कैची पण द्या प्लीज… लाल वायर तोडून अणुबाँब निकामी करण्याची वेळ आली तर उपयोगी पडेल…