'घर वापसी' सुरुच, गुजरातमध्ये ५०० ख्रिश्चनांनी केले धर्मांतर
By admin | Published: December 21, 2014 11:48 AM2014-12-21T11:48:11+5:302014-12-21T11:51:49+5:30
धर्मांतरावरुन देशभरात गदारोळ सुरु असूनही विश्व हिंदू परिषदेने 'घर वापसी'ची मोहीम सुरुच ठेवली आहे.
ऑनलाइन लोकमत
बलसाड, दि. २१ - धर्मांतरावरुन देशभरात गदारोळ सुरु असूनही विश्व हिंदू परिषदेने 'घर वापसी'ची मोहीम सुरुच ठेवली आहे. गुजरातमधील वलसाड येथे अरनाई येथे ख्रिस्ती समुदायातील सुमारे ५०० जणांचे धर्मपरिवर्तन करण्यात आले आहे. बळ किंवा लालूच दाखवून हे धर्मांतर करण्यात आलेले नाही असा दावाही विहिंपने केला आहे.
अरनाई या गावात शनिवारी विहिंपने घर वापसीचा कार्यक्रम आयोजित केला होता. यामध्ये सुमारे ५०० ख्रिश्चन आदिवासींनी हिंदू धर्म स्वीकारला. हे सर्व जण आधी हिंदूच होते. मात्र त्यानंतर या सर्वांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. आता या सर्वांना पुन्हा हिंदू धर्मात आणल्याचा दावा विहिंपचे स्थानिक नेते नातू पटेल यांनी केला. या कार्यक्रमात महायज्ञाचे आयोजनही करण्यात आले. घर वासपी करणा-या १०० कुटुंबातील सुमारे ५०० जणांनी यज्ञ केले व त्यानंतर प्रभू रामाचे चित्र व रुद्राक्षची माळ देऊन त्यांना हिंदू धर्मात प्रवेश देण्यात आला.
विहिंपच्या घर वापसी कार्यक्रमावरुन गुजरातमध्ये वाद निर्माण झाला आहे. वलसाडच्या जिल्हाधिका-यांनी चौकशीचे आदेश दिले आहे. धर्मांतराचा कार्यक्रम आयोजित करण्यापूर्वी स्थानिक प्रशासनाची परवानगी घेणे गरजेचे असते. विहिंपने जिल्हाधिका-यांकडे कार्यक्रमाची परवानगी घेतली होती का हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.