घरवापसी ! इस्लाम धर्म स्विकारलेल्या तरुणीचा पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश, भयानक अनुभव केला शेअर
By शिवराज यादव | Published: September 25, 2017 06:42 PM2017-09-25T18:42:07+5:302017-09-25T18:46:09+5:30
हिंदू धर्मातून इस्लाम धर्मात प्रवेश केल्यानंतर अथिराने घरवापसी करत पुन्हा एकदा हिंदू धर्म स्विकारला आहे. तीन महिन्यात अथिराची घरवापसी झाली आहे. जुलै महिन्यात अथिराने इस्लाम धर्म स्विकारला होता. यासाठी तिने आपल्या कुटुंबियांनाही सोडलं होतं.
कोच्ची - केरळच्या कासरगोड जिल्ह्यातील 23 वर्षीय अथिराच्या धर्मांतराला आात नव वळण मिळालं आहे. हिंदू धर्मातून इस्लाम धर्मात प्रवेश केल्यानंतर अथिराने घरवापसी करत पुन्हा एकदा हिंदू धर्म स्विकारला आहे. तीन महिन्यात अथिराची घरवापसी झाली आहे. जुलै महिन्यात अथिराने इस्लाम धर्म स्विकारला होता. यासाठी तिने आपल्या कुटुंबियांनाही सोडलं होतं. आपल्या मित्र-मैत्रिणींच्या बोलण्याला फसून आपलं इस्लाम धर्म स्विकारला होता असा दावा अथिराने केला आहे. अथिराने धर्मांतर केल्यानंतर आपलं नाव आयशा ठेवलं होतं. धर्मांतरानंतर बुरखा घालून आलेली अथिरा यावेळी ओम नम: शिवाय म्हणत सर्वांसमोर आली.
घर सोडण्याआधी लिहिलं होतं 15 पानांचं पत्र
अथिरा 10 जुलै रोजी रुग्णालयात जाण्याचा बहाण्याने घराबाहेर पडली होती. यानंतर कुटुंबियांना अथिराचं 15 पानी पत्र मिळालं होतं. पत्रात अथिराने आपण इस्लाम धर्माचा स्विकार करत असल्याचं लिहिलं होतं. याशिवाय तिने आपल्या मामाला फोन करुन आपण शांततेच्या शोधात आहोत असं सांगितंल होतं. यानंतर कुटुंबियांना पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखळ केली होती. ज्यानंतर अथिराला दंडाधिका-यांसमोर हजर करण्यात आलं होतं. 27 जुलै रोजी तिला महिला संरक्षण केंद्रात पाठवण्यात आलं. केरळ उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर तिला कुटुंबासोबत राहण्यासाठी पाठवण्यात आलं. यावेळी न्यायालयाने तिचं इस्लमाचं शिक्षण सुरु ठेवलं जाईल, तसंच हिंदू धर्म स्विकारण्यासाठी दबाव आणला जाणार नाही अशी अट ठेवली होती.
अथिराला झाली आपल्या चुकीची जाणीव
अथिराने सांगितल्यानुसार, तिला लवकरच आपल्या चुकीची जाणीव झाली आणि आपल्या मूळ धर्मात ती परतली. तिने सांगितलं की, तिचे सर्व मित्र मुस्लिम होते ज्यांनी तिला हिंदू धर्माविरोधात भरकटवण्याचं काम केलं. हिंदू धर्मातील चुकीच्या गोष्टींबद्दल ते सांगत असत. हिंदू धर्मात एका दगडाची पूजा करत तुम्ही मदतीची अपेक्षा कशी काय ठेवू शकता असं ते बोलायचे. यावेळी इस्लाममध्ये फक्त एकच देव 'अल्लाह' आहे असंही ते सांगत असत. अथिराने सांगितलं की, हिंदू धर्म सोडल्यानंतर ती अनिसा आणि सिराजच्या मदतीने सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया आणि पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या संपर्कात आली. ज्यांनी तिला आत्मसमर्पण करण्याआधी आणि आई-वडिलांकडे जाण्याआधी प्रसारमाध्यमांकडे जाऊन मुलाखत देण्याचा सल्ला दिला.
पुस्तकातून देण्यात आली नरकाची माहिती
अथिराने दिलेल्या माहितीनुसार, तिला झाकीर नाईकची भाषणं ऐकवण्यात आली ज्यामध्ये फक्त इस्लाम धर्म योग्य असून बाकी धर्म चुकीचे असल्याचा तर्क लावला जात असे. हे ऐकल्यानंतर इस्लाम धर्म सर्वश्रेष्ठ असल्याचं तिला वाटू लागलं होतं. तिला नरकाची माहिती देणारं एक पुस्तकही शिकवण्यात आलं. यामुळे पुस्तकात लिहिल्याप्रमाणे आपल्यासोबत ते सर्व काही होईल असं तिला वाटू लागलं. 'आता आपल्या कुटुंबासोबत राहताना मला जाणवतंय की लोकांना जेव्हा आपल्या धर्माबाबात संपुर्ण ज्ञान नसतं तेव्हाच ते दुस-या धर्माकडे आकर्षित होतात', असं अथिरा सांगते. आधी आपल्या धर्माचा अभ्यास करा आणि नंतर निर्णय घ्या असं आवाहन तिने केलं आहे. जे आपल्यासोबत झालं ते इतर कोणासोबत होऊ नये अशी इच्छा तिने व्यक्त केली आहे.