Lok Sabha Election Voting: गुगलकडून डुडलद्वारे लोकशाहीचा सन्मान, भारतीयांना मतदान करण्याचं आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2019 08:41 AM2019-04-11T08:41:54+5:302019-04-11T09:12:08+5:30
Maharashtra Election Voting Live :17 व्या लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यासाठी राज्यात विदर्भातील 7 मतदारसंघात आज मतदान होत आहे.
मुंबई - लोकशाहीच्या महापर्वातील पहिल्या अध्यायाला आज सुरुवात झाली आहे. त्यामुळे, मतदारांनी अपना टाईम आ गया असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण, देशाच्या संसदेत आपला लोकप्रतिनिधी पाठविण्यासाठी सर्वसामान्य नागरिक आज मतदानाचा हक्क बजावत आहे. देशातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशातील या महापर्वाची नोंद घेत गुगलनेही डुडलद्वारे भारतीयांना मतदान करण्याचे आवाहन केलं आहे.
17 व्या लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यासाठी राज्यात विदर्भातील 7 मतदारसंघात आज मतदान होत आहे. त्यामध्ये, नागपूर, रामटेक, गोंदिया-भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ-वाशीम, गडचिरोली-चिमूर या सात मतदारसंघांचा यामध्ये समावेश आहे. मतदानाला सकाळी 7 वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. नागरिकांमध्ये निवडणुकांचा उत्साह दिसत असून मतदान केंद्रावर रांगा लागत आहेत. देशातील लोकशाहीच्या या महापर्वाची दखल गुगल या जगप्रसिद्ध सर्ज इंजिनने घेतली आहे. गुगलने डुडलद्वारे मतदान करण्याचे आणि मतदान करण्याची प्रकिया समजावून सांगितली आहे.
गुगलकडून नेहमीच जनजागृती आणि जगप्रसिद्ध किंवा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सन्मान केला जातो. त्यामध्ये, कलाकार, राजकीय, सामाजिक, क्रीडा, साहित्य क्षेत्रांसह इतरही क्षेत्रातील महान व्यक्ती किंवा कार्याला अभिवादन केलं जात. ऑलिंम्पिक असेल, विश्वचषक स्पर्धा असेल किंवा इतर कुठलाही मोठा उत्सव असेल, गुगलकडून शुभेच्छा देण्यात येतात. भारतीय सण, उत्सव, स्पर्धा, व्यक्ती, स्वातंत्र दिन, प्रजासत्ताक दिन आणि ऐतिहासिक आठवणींचा गुगलद्वारे सन्मान करण्यात येतो. त्यामुळेच भारतीय लोकशाहीतील महापर्वातील अध्यायाच्या शुभारंभाची दखल घेत गुगले मतदानारुपी डुडल साकारले आहे. गुगलच्या इंग्रजी अक्षरातील तिसऱ्या क्रमांकाचे O (ओ) हे अक्षर गुगलने मतदानरुपी दर्शवले आहे. त्यामध्ये, डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावल्याचे दिसत आहे.