भारतीय हुतात्मा सैनिकांचा बांगलादेश करणार सन्मान

By admin | Published: March 27, 2017 01:37 AM2017-03-27T01:37:13+5:302017-03-27T01:37:13+5:30

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना वाजेद येत्या ७ ते १० एप्रिल दरम्यान भारत दौऱ्यावर येतील तेव्हा त्या बांगलादेश

Honor to Indian martyr soldiers Bangladesh | भारतीय हुतात्मा सैनिकांचा बांगलादेश करणार सन्मान

भारतीय हुतात्मा सैनिकांचा बांगलादेश करणार सन्मान

Next

नवी दिल्ली: बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना वाजेद येत्या ७ ते १० एप्रिल दरम्यान भारत दौऱ्यावर येतील तेव्हा त्या बांगलादेश मुक्ती युद्धात शहीद झालेल्या भारतीय जवानांच्या कुटुंबियांचा गौरव करतील, असे समजते.
बांगलादेशाच्या स्वातंत्र्यासाठी भारतीय सैन्य दलांमधील एकूण १,६६१ जवानांनी प्राणांची आहुती दिली होती. त्यापैकी सात जवानांच्या कुटुंबांचा शेख हसिना दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ८ एप्रिल रोजी होणाऱ्या कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरूपात सन्मान करतील, असे माहितगार सूत्रांनी सांगितले. यात लष्करातील चार व हवाई दल, नौदल आणि सीमा सुरक्षा दलातील एका हुतात्मा जवानाच्या कुटुंबाचा समावेश असेल. यावेळी या जवानांच्या कुटुंबियांना तीन भाषांमध्ये लिहिलेले सन्मानपत्र व पाच लाख रुपयांचा धनादेश शेख हसिना यांच्या हस्ते दिला जाईल. हुतात्मा झालेले इतर सैनिक कोणकोणत्या भागातील आहेत याचा आढावा घेऊन त्या त्या भागांत नंतर स्वतंत्र कार्यक्रम करून बांगलादेश सरकारमधील मंत्र्यांच्या हस्ते या सैनिकांच्या गौरवाचे कार्यक्रम टप्प्याटप्प्याने आयोजित केले जातील, असे बांगलादेश सरकारने ठरविले आहे. येत्या काही महिन्यांत असे पाच-सहा कार्यक्रम आयोजित केले जातील.
याआधी बांगलादेशने त्यांच्या मुक्ती लढ्यात भारतातील ज्या विविध वर्गांतील लोकांचा मोलाचा सहभाग राहिला अशा अनेक मान्यवरांचा ‘बंगमित्र’ पुरस्कार देऊन सत्कार केला होता. त्यात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी व अटल बिहारी वाजपेयी, विद्यमान पंतप्रधान मोदी व काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याखेरीज अनेक लष्करी अधिकारी, राजकीय नेते, कार्यकर्ते, पत्रकार, डॉक्टर व राजनैतिक मुत्सद्यांचा समावेश होता.
त्यानंतर मुक्ती लढ्यात धारातीर्थी पडलेल्या भारतीय जवानांचाही यथोचित गौरव करण्याचा बांगला देश सरकारने विचार केला. मोदी यांच्या सन २०१५ मधील बांगलादेश दौऱ्यात त्यावर औपेचारिक निर्णय झाला व त्यानंतर बांगलादेश व भारताच्या संरक्षण मंत्रालयाने एकत्रितपणे याचा तपशिलवार कार्यक्रम तयार केला. यासाठी हसिना सरकारने १०० कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचेही समजते. (लोकमत न्यूज नेटवर्क)

लाखो नागरिकांची निरंकुश कत्तल
मार्च ते डिसेंबर १९७१ या काळात झालेल्या बांगलादेश मुक्ती लढ्यात ३ ते ३० लाख लोकांचा नरसंहार केला गेला, असा अंदाज आहे. यात हिंदू, मुस्लिम, बंगाली व बिगर बंगालींचा समावेश होता.पाकिस्तानी लष्कराने पूर्व पाकिस्तानातील नागरिकांविरुद्ध ‘आॅपरेशन सर्चलाइट’ नावाची दडपशाहीची क्रूर मोहीम हाती घेतली. त्यातून मुक्ती संग्राम उभा राहिला.
दि. १६ डिसेंबर १९७१ रोजी पूर्व पाकिस्तान मुक्त होऊन स्वतंत्र बांगलादेश झाला. त्या विनाशकारी कालखंडाची आठवण म्हणून ज्या दिवशी ‘आॅपरेशन सर्चलाइट’ सुरु झाले तो २५ मार्चचा दिवस ‘बागलादेश नरसंहार दिन’ म्हणून तेथे पाळला जातो.

Web Title: Honor to Indian martyr soldiers Bangladesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.