सामाजिक कार्यात योगदान दिलेल्या खासदारांचा सन्मान- विजय दर्डा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 06:21 PM2017-07-19T18:21:58+5:302017-07-19T20:27:08+5:30
लोकमत समूहाचे चेअरमन आणि माजी खासदार विजय दर्डा यांनी या पुरस्कार सोहळ्याला संबोधित करताना खासदारांचं कौतुक केलं आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 19 - दिल्लीच्या विज्ञान भवनात लोकमत संसदीय पुरस्कार सोहळा संपन्न झालाय. लोकमत समूहाचे चेअरमन आणि माजी खासदार विजय दर्डा यांनी या पुरस्कार सोहळ्याला संबोधित करताना खासदारांचं कौतुक केलं आहे. ते म्हणाले, ब-याचदा संसदेत कामकाजाच्या पद्धतीचा मीडिया आणि इतर माध्यमांतून चुकीच्या पद्धतीनं विश्लेषण केलं जातं. लोकमतनं या पलिकडे जाऊन संसदेत काम करणा-या खासदारांच्या कामाचं योग्य मूल्यांकन करण्यासह देशासाठी प्रभावी काम करणा-या खासदारांना सन्मानित केलं आहे.
प्रसारमाध्यमाच्या क्षेत्रात पहिल्यांदाच एखाद्या वृत्तपत्र समूहानं खासदारांचा अशा प्रकारे बहुमान केला असावा. देशाचे उपराष्ट्रपती यांनीही लोकमतच्या या प्रयत्नांचं कौतुक केलं आहे. आमचे उद्दिष्ट इतरांना त्यांच्या सामाजिक कार्यासाठी प्रेरित करण्याचा आहे. संसदेच्या कार्यकाळात उत्कृष्ट काम केलेल्या खासदारांना पुरस्कार देऊन त्यांच्या सामाजिक कार्याचा सन्मान करण्याचा आमचा उद्देश आहे.
या ज्युरींनी केली निवड
देशातील मान्यवर नेते, संसदेचे माजी सचिव व पत्रकारांच्या स्वतंत्र ज्युरी मंडळाला पुरस्कारयोग्य संसद सदस्यांची निवड करण्याची जबाबदारी लोकमतने सोपवली होती. सुमारे ९ तासांच्या चर्चेनंतर ज्युरींनी ८ संसद सदस्यांची निवड केली. ज्युरी मंडळाचे अध्यक्षपद लोकसभेचे माजी अध्यक्ष व माजी गृहमंत्री शिवराज पाटील यांनी भूषवले. ज्युरी मंडळामध्ये डॉ. मुरली मनोहर जोशी, मल्लिकार्जुन खरगे, सीताराम येचुरी, शरद यादव, माजी लोकसभा सचिव सुभाष कश्यप, इंडिया टीव्हीचे संपादक रजत शर्मा, इंडिया टुडेचे राजकीय संपादक राजदीप सरदेसाई, लोकमत वृत्तपत्र समूहाचे अध्यक्ष विजय दर्डा व सदस्य सचिव पत्रकार हरीश गुप्ता यांचा समावेश होता.